जेव्हा पुतिन यांची लीमो पाहून लहान मुलांसारखा उत्साही झाला हुकूमशाह, कधी हात लावला, कधी बसून पाहिलं!

उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग उन रशियाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी किम जोंग उन हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची लीमोझिन कार एखाद्या लहान मुलाप्रमाणे कौतुकाने पाहत होते. इतकंच नाही तर  त्यांनी आतही बसून पाहिलं.   

शिवराज यादव | Updated: Sep 14, 2023, 04:58 PM IST
जेव्हा पुतिन यांची लीमो पाहून लहान मुलांसारखा उत्साही झाला हुकूमशाह, कधी हात लावला, कधी बसून पाहिलं! title=

उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग उन रशियाच्या दौऱ्यावर असून, यावेळी त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची भेट घेतली. दोन्ही देशातील प्रमुखांच्या भेटीकडे संपूर्ण जगाचं लक्ष आहे. युक्रेनविरोधातील युद्ध अद्यापही सुरु असून, यादरम्यान किम जोंग उन यांनी भेट घेणं सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. दरम्यान किम जोंग उन आणि व्लादिमिर पुतिन यांच्या भेटीचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातील एका व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. याचं कारण यामध्ये किम जोंग उन एखाद्या लहान मुलाप्रमाणे व्लादिमिर पुतिन यांच्या अध्यक्षीय कारला न्याहाळत आहेत. यानंतर पुतिन यांनी त्यांना आतही बसू दिलं. याआधी 2018 मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीदरम्यान असंच काहीस झालं होतं. त्यावेळी किम जोंग उन यांना डोनाल्ड ट्रम्प यांची लीमो फक्त बाहेरुन पाहता आली होती.

किम जोंग उन आपल्या ट्रेनने रशियात दाखल झाले होते. रशियातील अगदी पूर्वेला असलेल्या व्होस्टोकनी कॉस्मोड्रोम येथे प्रक्षेपण तळाच्या प्रवेशद्वारावर पुतिन यांनी किम यांचं स्वागत केलं. येथे औपचारिक भेट झाल्यानंतर किम जोंग उन यांच्या नजरेस पुतिन यांनी अध्यक्षीय ऑरस लीमोझिन कार पडली. यानंतर ते कौतुकाने ही कार न्याहाळत उभे राहिले होते. किम जोंग उन यांची ही उत्सुकता पुतिन यांनीही हेरली आणि गाडीत बसण्याची विनंती केली. इतक्या कौतुकाने गाडी पाहणाऱ्या किम यांनीही त्यास नकार दिला नाही आणि मागील सीटवर जाऊन बसले. 

किम जोंग उन यांना गाडीच्या मागील सीटवर बसवल्यानंतर पुतिनही नंतर आत जाऊन बसले. पुतिन यांनी लक्झरी गाड्यांची प्रचंड आवड असून त्यांच्या ताफ्यात अनेक मर्सिडीज, लेक्सस एसयुव्ही आणि रोल्स रॉयल्सची फँटम असल्याची माहिती आहे. 

रशियन लक्झरी ऑटो ब्रँड NAMI द्वारे निर्मित करण्यात आलेली Aurus Senat ही चिलखताप्रमाणे सुरक्षित लीमो आहे. 598 हॉर्सपॉवर असणारी ही कार 4.4-लिटर V8 इंजिनवर चालते. 

21.7 फूट लांब आणि 14,330 पौंड वजन असलेल्या सेनेटमध्ये हायब्रिड ड्राइव्ह सिस्टीम आणि 9-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन समाविष्ट करण्यात आलं आहे. दरम्यान NAMI आणखीन जास्त मजबूत अशी कार निर्मिती करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती आहे. या कारची हॉर्सपॉवर 6.6 लीटर असेल आणि V-12 इंजिनवर धावेल. 

याआधी 2018 मध्ये जेव्हा किम जोंग उन आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट झाली होती, तेव्हाही असंच काहीसं घडलं होतं. किम जोंग उन हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या  1.6 मिलियन किंमतीच्या लीमोझिनजवळ गेले असता त्यांना बाहेरुन पाहण्यास परवानगी देण्यात आली होती. त्याचा व्हिडीओही समोर आला होता. यामध्ये सिंगापूरमध्ये बैठकीसाठी पोहोचलेले किम जोंग उन डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारच्या दिशेने गेले होते. यावेळी डोनाल्ड ट्रम्पही उपस्थित होते. यावेळी सिक्रेट सर्व्हिस एंजटने कारचा दरवाजा उघडला होता. किम जोंग उन यांनी बाहेरुनच गाडी पाहिल्यानंतर तेथून चालत निघून गेले होते. ही कार लष्करी पद्दतीने केलेल्या किंवा रासायनिक युद्ध हल्ल्यापासून वाचण्यासाठी डिझाइन केलेली आहे.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x