अब्जाधीश तरुणाने पुरुषाशी केलं लग्न, पण लग्नानंतर 2 तासातच सगळं काही संपलं; संपूर्ण देशभरात खळबळ

तैवानमधील (Taiwan) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वारसदार म्हणून अब्जोंची संपत्ती मिळालेल्या 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. विशेष बाब म्हणजे, त्याने एका पुरुषाशी लग्न केल्यानंतर दोन तासातच मृतदेह आढळला. मृत तरुणाच्या आईने हत्येचा आरोप केला आहे.   

शिवराज यादव | Updated: May 24, 2023, 03:44 PM IST
अब्जाधीश तरुणाने पुरुषाशी केलं लग्न, पण लग्नानंतर 2 तासातच सगळं काही संपलं; संपूर्ण देशभरात खळबळ title=

Crime News: तैवानमधील (Taiwan) एक अजब आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे वारसदार म्हणून अब्जोंची संपत्ती मिळालेल्या 18 वर्षीय तरुणाचा लग्नाच्या दोन तासानंतरच मृत्यू झाला आहे. तरुणाने एका पुरुषाशी लग्न केलं होतं. त्यांची फक्त दोन वेळाच भेट झाली होती असं वृत्त Independent ने दिलं आहे. तरुणाला वारसदार म्हणून आपल्या वडिलांच्या निधनानंतर 500 मिलियन डॉलर्सची संपत्ती मिळाली होती. भारतीय मूल्यात ही संपत्ती 1 अब्ज 34 कोटी 96 लाख 95 हजार 476 इतकी आहे. 

रिपोर्टनुसार, 4 मे रोजी 10 माळ्याच्या निवासी इमारतीमधील तळमजल्यावर तरुणाला मृतदेह आढळला. पोलिसांनी चौकशी केली असता याच इमारतीत त्याची रिअल इस्टेट एजंट असिस्टंट हासिया राहत असल्याचं समोर आलं. विशेष म्हणजे 26 वर्षीय हसिया आणि लाई यांनी मृत्यूच्या दोन तासांपूर्वीच आपल्या लग्नाची नोंदणी केली होती. 

हसिया आणि लाईचे वडील रिअल इस्टेट एजंट होते. हसिया मृत लाईच्या वडिलांना त्यांची संपत्ती सांभाळण्यास मदत करत होता. नंतर त्याने त्यांच्या मुलासोबत काम करण्यास सुरुवात केली होती. 

19 मे रोजी तैवानमधील प्रसारमाध्यमांनी हे प्रकरण उजेडात आणलं. लाईच्या आईने आपल्या वकिलासह पत्रकार परिषद घेतल्यानंतर या घटनेचा वाच्यता फुटली. ताइचुंग शहरात ही पत्रकार परिषद पार पडली. लाईच्या आईने हा मृत्यू संशयास्पद असल्याचं म्हटलं आहे. तसंच ज्या परिस्थितीत मृत्यू झाला आहे त्यावर शंका उपस्थित केली आहे. एप्रिल महिन्यात वडिलांचं निधन झाल्यानंतर इतकी मोठी संपत्ती मिळालेली असतानाचा अशाप्रकारे मृत्यू होणं भुवया उंचावणारं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 

आपल्या मुलाची पैशांसाठी हत्या करण्यात आली असून, ती आत्महत्या दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे असा त्यांचा आरोप आहे. तसंच आपला मुलगा समलिंगी नसून, हसिया याच्याशी मृत्यूच्या आधी फक्त दोनवेळा भेट झाली होती असा दावा त्यांनी केली आहे. यामधील पहिली भेट त्याच्या वडिलांच्या अंत्यसंस्कारावेळी झाली होती.

The Strait Times च्या वृत्तानुसार, आपल्या मुलाने आत्महत्या केली आहे हे आपण कधीच स्वीकारणार नाही असं त्यांनी सांगितलं आहे. त्याने आत्महत्या करण्यासारखं कोणतंही कारण नव्हतं. तो स्थानिक विद्यापीठात तत्त्वज्ञान शिकण्यासाठी तयार असलेला आज्ञाधारक मुलगा होता असं त्या म्हणाल्या आहेत. 

मृतदेहाचं निरीक्षण केलं असता, फॉरेन्सिक मेडिकल एक्स्पर्ट Kao Ta-cheng यांनी दावा केली आहे की, शरिरावरील जखमा पाहता तो 10 व्या माळ्यावरुन खाली पडला आहे असं वाटत नाही. कारण त्याचं डोकं आणि पोटात ब्लड फ्लो झाला नव्हता. खाली पडण्याआधी त्याला विष दिलं असावं अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली आहे. 

तैवानमधील समलिंगी विवाह कायदेशीर आहे. तैवानच्या नागरी संहितेअंतर्गत, समलिंगी विवाहातील भागीदारांना वारसा हक्कांसह इतर विवाहांसारखेच कायदेशीर अधिकार आहेत.