इस्त्रायलच्या भूमीवर पाय ठेवणारे मोदी पहिले भारतीय पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून इस्त्रायलच्या दौऱ्यावर जात आहेत.

Updated: Jul 3, 2017, 10:58 PM IST
इस्त्रायलच्या भूमीवर पाय ठेवणारे मोदी पहिले भारतीय पंतप्रधान title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून इस्त्रायलच्या दौऱ्यावर जात आहेत. आपल्या दोन देशांमधली मैत्री तशी 25 वर्षं जुनी असली, तरी इस्त्रायलला आपल्या या मित्राचा पाहुणाचार करण्यास तब्बल 70 वर्षं वाट बघावी लागली आहे.

14 मे 1948 हा इस्त्रायलचा जन्मदिवस आहे. 29 जानेवारी 1992 साली इस्त्रायल आणि भारत यांच्यामध्ये मैत्रीचे संबंध प्रस्थापित झाले. पण तब्बल 7 दशकं, म्हणजे 70 वर्षांत पहिल्यांदा भारतीय पंतप्रधान इस्त्रायलच्या भूमीवर पाय ठेवणार आहेत.

सुमारे 4 हजार किलोमीटरचं अंतर पार करून पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या इस्त्रायल दौऱ्यावर जातील. त्यांच्या स्वागतासाठी इस्त्रायलचं सरकार आणि जनता सज्ज आहे. इस्त्रायली दुतावासानं ट्विटरवर एक व्हिडिओ जारी केलाय. यामध्ये इस्त्रायली लोक हिंदीमध्ये पंतप्रधानांचं स्वागत करताना दिसत आहेत.

4 जुलैला तेल अवीवच्या बेन गुरियन विमानतळावर इस्त्रायली पंतप्रधान नितन्याहू स्वतः मोदींच्या स्वागताला हजर असतील. तिथं पंतप्रधानांच्या स्वागतार्थ एका समारंभाचं आयोजन करण्यात आलंय. यावेळी दोन्ही देशांचं राष्ट्रगीत होईल.

भारतीय वंशाची इस्त्रायली गायिका लिओरा इत्जाक हीच दोन्ही राष्ट्रगीतं म्हणणार आहे. इस्त्रायलची लोकसंख्या खरंतर मुंबईपेक्षाही कमी आहे, पण सुरक्षा आणि तंत्रज्ञानामध्ये हा देश जगातल्या शक्तीशाली देशांपैकी एक मानला जातो.

चारही दिशांना शत्रूराष्ट्र असलेला ज्यू धर्मियांचा हा देश कायम सावध असतो. प्रत्येक घर, प्रत्येक व्यक्ती, इतकंच काय, घरातलं प्रत्येक मूल धोकादायक परिस्थितीसाठी सज्ज असतो. इस्त्रायली मीडियामध्येही पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याची जोरदार चर्चा आहे.

इस्त्रायलमधलं आघाडीचं वृत्तपत्र द जेरुसलेम पोस्टनं मोदीज व्हिजिट या नावानं एक लिंकच तयार केलीये. तर अन्य एका बड्या वर्तमानपत्रानं काही दिवसांपूर्वी बातमीचा मथळा दिला होता. जगातले सर्वात महत्त्वाचे पंतप्रधान येत आहेत.

इस्त्रायली पंतप्रधानांच्या निवासस्थानी 4 जुलैला पंतप्रधान मोदींसाठी मेजवानी ठेवण्यात आलीये. यावेळीच दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होईल. 5 जुलैला नितन्याहू यांच्यासोबत मोदी दुपारचं जेवण घेतील. त्यानंतर इस्त्रायलचे अध्यक्ष रुवेन रिवलिन आणि विरोधी पक्षनेते इसार हरजोग यांना पंतप्रधान मोदी भेटतील. या दौऱ्यात भारत आणि इस्त्रायलमध्ये संरक्षण, कृषी, पर्यटन आणि तंत्रज्ञानासह अनेक क्षेत्रांमध्ये महत्त्वाचे करार होणार आहेत.

5 जुलैला तेल अवीवच्या कन्व्हेंशन सेंटर सभागृहात पंतप्रधान मोदींचं प्रवासी भारतीयांसमोर भाषण होईल. या कार्यक्रमाला 4 हजार अनिवासी भारतीय उपस्थित राहतील, असं सांगितलं जातंय. इस्त्रायलमध्ये सुमारे 70 हजार भारतीय वंशाचे ज्यू नागरिक राहतात. यावेळी 26/11च्या मुंबई हल्ल्यात बळी पडलेल्या मोशेच्या कुटुंबियांचीही पंतप्रधान भेट घेणार आहेत.