मंकीपॉक्सची दहशत वाढली! 30 देशांमध्ये संक्रमितांची संख्या 550 वर

कोरोनाच्या संकटानंतर आता मंकीपॉक्स विषाणूची दहशत वाढली आहे.

Updated: Jun 3, 2022, 03:26 PM IST
मंकीपॉक्सची दहशत वाढली! 30 देशांमध्ये संक्रमितांची संख्या 550 वर  title=

कोरोनाच्या संकटानंतर आता मंकीपॉक्स विषाणूची दहशत वाढली आहे. मंकीपॉक्सचा फैलाव जगातील 30 देशांमध्ये झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार आतापर्यंत 30 देशांमध्ये 550 प्रकरणं नोंदवली गेली आहेत. त्यामुळे मंकीपॉक्सची दहशत निर्माण झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं इशारा देत सांगितलं आहे की, दुर्मिळ विषाणू ज्या देशांमध्ये अद्याप व्हायरस आढळला नाही अशा देशांमध्ये खूप लवकर पसरू शकतो. सध्या ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, स्वीडन, अमेरिका आणि नेदरलँड्समध्ये प्रत्येकी पाच जणांना मंकीपॉक्सचे निदान झाले आहे. स्पेन, ब्रिटन आणि पोर्तुगालसारख्या देशांमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंकीपॉक्सची दहशत पाहता मार्गदर्शक तत्त्वे आधीच जारी केली आहेत.

युरोपमध्ये मंकीपॉक्सच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. रोगाचे कारण आणि विषाणूचे स्वरूप देखील बदलत आहे. मंकीपॉक्सच्या फैलावाबद्दल शास्त्रज्ञ खूपच चिंतित आहेत. मंकीपॉक्स विषाणूमागची कारणं काय? याचा शोध घेतला जात आहे, असं जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं आहे. दुसरीकडे, वेळीच सावध न झाल्यास या दुर्मिळ विषाणू साथीचा रोग होऊ शकतो, अशी भीतीही व्यक्त केली आहे.  

प्राण्यांपासून मानवांमध्ये हा विषाणू पसरण्याची शक्यता सर्वाधिक असल्याचं बोललं जात आहे. या आजाराची लक्षणे दिसेपर्यंतचा कालावधी 6 ते 13 दिवसांचा असतो. काही रुग्णांमध्ये हा कालावधी 5 ते 21 दिवसांपर्यतचाही असू शकतो.