NASA Video : आंतरराष्ट्रीय अंतराळ क्षेत्रामध्ये सध्या अनेक घडामोडी घडत असून, यामध्ये सर्वाधिक चर्चेचा विषय ठरत आहे तो म्हणजे नासाच्या अंतराळयात्री सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर यांच्या परतीसाठी सुरु असणाऱ्या प्रयत्नांचा. बोईंग स्टारलायनरमध्ये उदभवलेल्या हेलियम लिकमुळंय या अंतराळवीरांच्या पृथ्वीवर पतण्याचा प्रवास लांबणीवर पडत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
इथं नासापुढं ही मोठी अडचण असतानाच तिथं, नासानं एक लक्षवेधी व्हिडीओ शेअर केला. ज्यामुळं अनेकांची चिंता वाढली. हरितगृह वायूंचा पृथ्वीवर एकंदर किती वाईट परिणाम होत आहे हेच नासाच्या या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे पाहता येतंय. Visualisation च्या माध्यमातून नासानं हा व्हिडीओ शेअर करत जणू संपूर्ण जगालाच धोक्याचा इशारा दिला आहे. मानवी कृतीमुळं निर्माण होणारा वायू महासागराच्या हालचालींवर परिणाम करताना दिसत आहे. पृथ्वीच्या भवितव्याच्या दृष्टीनं ही अतिशय धोक्याची बाब असून, त्याचसंदर्भात नासानं इशारा देत जगाला सतर्क केलं.
नासानं जारी केलेल्या या पोस्टनुसार लाल, नारंगी आणि पिवळा रंग उष्ण तापमानाकडे खुणावत असून, हिरवा आणि निळा रंग शीतलहरी दर्शवत आहे. नासाच्या कॅप्शननुसार पृथ्वीवरील 70 टक्के भाग हा पाण्यानं व्यापला असून, त्यामुळं पृथ्वीवरील महासागर पृथ्वीवरील जीवसृष्टीमध्ये संतुलन राखण्याचं मोठं काम करतात. पण, सध्या मानवी कृतीतून हरितगृहवायूंमुळं मात्र पृथ्वीवरील महासागरामध्ये भयावह बदल होण्यास सुरुवात झाली आहे. या बदलांमुळं जीवसृष्टीचा ऱ्हास नजीक असल्याचेच संकेत मिळत असल्याचं मत काही अभ्यासकांनी मांडलं आहे.