'पार्कर सोलर प्रोब' यानाच्या उड्डाणाचा आजचा 'नवा मुहूर्त'

सूर्याच्या दिशेनं झेपावणार यान

Updated: Aug 12, 2018, 11:21 AM IST
'पार्कर सोलर प्रोब' यानाच्या उड्डाणाचा आजचा 'नवा मुहूर्त'

मुंबई : अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था, नासाच्या 'पार्कर सोलर प्रोब' मोहिमेमध्ये यानाचं उड्डाण काही तांत्रिक कारणांमुळे शनिवारी होऊ शकलं नाही. आता आज भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी सव्वा वाजताची नवी वेळ उड्डाणासाठी निश्चित करण्यात आली आहे. शनिवारी सोलर प्रोब घेऊन यान सूर्याच्या दिशेनं झेपावणार होतं. मात्र या उड्डाणात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आणि उड्डाणासाठी सुयोग्य असलेला ४५ मिनिटांचा कालावधी संपला. त्यामुळे यानाचं उड्डाण झालंच नाही. 

सूर्याच्या अत्यंत जवळ जाऊन त्याचा अभ्यास करण्यासाठी नासानं ही मोहीम हाती घेतली आहे. आतापर्यंत कोणतंही मानवनिर्मित यान सूर्याच्या एवढ्या जवळ गेलेलं नाही. एका कारच्या आकाराचं हे यान आहे. सूर्याच्या 40 लाख मील दूर अंतरावर हे यान असणार आहे. याआधी कोणत्याही यानाने इतक्या जवळून सूर्याच्या कक्षेत प्रवेश केलेला नाही. 2024 पर्यंत हा सूर्याला 7 फेऱ्या मारणार आहे. पार्कर सोलर प्रोब सोबत अनेक उपकरणं घेऊन जाणार आहे.