उत्तर कोरियाने पुन्हा उडवली झोप, बॅलिस्टिक क्षेपणास्त्र जपानच्या दिशेने डागले; बोलावली आपत्कालीन बैठक

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने (UNSC) निर्बंध लादले असूनही, उत्तर कोरियाने (North Korea) आपले आण्विक आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र (Ballistic Missile) कार्यक्रम पुढे चालू ठेवला आहे.  

Updated: Oct 19, 2021, 12:08 PM IST
 उत्तर कोरियाने पुन्हा उडवली झोप, बॅलिस्टिक क्षेपणास्त्र जपानच्या दिशेने डागले; बोलावली आपत्कालीन बैठक
संग्रहित छाया

सियोल : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने (UNSC) निर्बंध लादले असूनही, उत्तर कोरियाने (North Korea) आपले आण्विक आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र (Ballistic Missile) कार्यक्रम पुढे चालू ठेवला आहे. दक्षिण कोरियाच्या ज्वॉइंट चीफ्स ऑफ स्टाफचा (JCS) हवाला देत उत्तर कोरियाने जपानच्या (Japan) समुद्रात बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागल्याची माहिती मिळाली आहे.

उत्तर कोरियाकडून जलद क्षेपणास्त्र चाचणी  

आमची सहयोगी वेबसाइट WION मध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, यापूर्वीही दक्षिण कोरियन लष्कराने म्हटले होते की, उत्तर कोरियाने जपानच्या समुद्रात अज्ञात क्षेपणास्त्र डागले आहे. परंतु त्याच्याशी संबंधित अधिक माहिती उघड होऊ शकलेली नाही. उत्तर कोरिया काही काळापासून क्षेपणास्त्र चाचण्या घेत आहे. मात्र संयुक्त राष्ट्राने उत्तर कोरियावर बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आणि अण्वस्त्रांच्या चाचणीसाठी निर्बंध लादले आहेत.

जपान तटरक्षक दलाने जारी केला इशारा 

जपान सरकार असे गृहीत धरत आहे की, उत्तर कोरियाने डागलेले क्षेपणास्त्र बॅलेस्टिक क्षेपणास्त्र असू शकते. आता धोका लक्षात घेता, जपानी तटरक्षक दलाने (Coast Gaurd) जहाजांना संभाव्य चाचणीसाठीचा इशारा दिला आहे. जपानी तटरक्षक दलाने सागरी सुरक्षेचा इशारा जारी केला आहे. मात्र, हे क्षेपणास्त्र कोणत्या लक्ष्यावर डागण्यात आले हे स्पष्ट झालेले नाही. त्याचवेळी, अलीकडेच, जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांनी जपानचे संरक्षण बजेट वाढवून सुरक्षा क्षमता वाढवण्याच्या गरजेवर भर देण्याचे सांगितले होते.

दक्षिण कोरियाने बोलावली बैठक 

क्षेपणास्त्र प्रक्षेपणावर चर्चा करण्यासाठी दक्षिण कोरियाच्या अध्यक्षीय कार्यालयाने राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची बैठक आयोजित केली आहे. शांततेच्या एक महिन्यानंतर उत्तर कोरियाने पुन्हा एकदा अण्वस्त्र चाचण्या सुरू केल्या आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांचे उत्तर कोरियाचे विशेष दूत सुंग किम येत्या काही दिवसांत सियोलमध्ये अमेरिकन मित्र राष्ट्रांशी भेटून उत्तर कोरियाशी चर्चा पुन्हा सुरू करण्याच्या शक्यतेवर चर्चा करतील.

वॉशिंग्टन आणि प्योंगयांग यांच्यातील आण्विक चर्चा दोन वर्षांहून अधिक काळ रखडली आहे. उत्तर कोरियाने अटींशिवाय चर्चा सुरू करण्यासाठी बायडेन प्रशासनाचे प्रस्ताव स्वीकारण्यास नकार दिला आहे. उत्तर कोरियाच्यावतीने असे म्हटले गेले आहे की, अमेरिकेने आधी आपले शत्रुत्व धोरण सोडले पाहिजे.