नवी दिल्ली : पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायुदलाने पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मदचे ट्रेनिंग कॅम्पवर हल्ला करत ३०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला. यानंतर दोन्ही देशांमध्ये एलओसीवर तणाव वाढला आहे. भारत-पाकिस्तानमधील हा वाढता तणाव पाहता पाकिस्तानने समझौता एक्सप्रेस रद्द केली आहे. भारतातून ही रेल्वे बुधवारी २७ प्रवाशांना घेऊन आपल्या नियमित वेळेला लाहोरसाठी रवाना झाली होती. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी म्हटलं की, 'आम्हाला समझौता एक्सप्रेस रद्द केल्याबद्दल कोणतीही माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून मिळालेली नाही.'
बुधवारी समझौता एक्सप्रेस २७ प्रवाशांना घेऊन निघाली. त्यादरम्यान चर्चा होती की पाकिस्तानने वाघा ते लाहोरदरम्यान ही ट्रेन रद्द केली आहे. रेल्वे प्रशासनाने म्हटलं की, 'दिल्ली ते अटारी धावणारी ट्रेन बुधवारी रात्री ११.२० वाजता रवाना झाली. ट्रेनमध्ये ३ पाकिस्तानी आणि २४ भारतीय नागरिक होते.
आठवड्यातून बुधवारी आणि रविवारी धावणारी ही ट्रेन आपल्या नियमित वेळेला दिल्ली येथून २७ प्रवाशांना घेऊन रवाना झाली. यापैकी ४ प्रवासी हे एसी आणि २३ प्रवासी नॉनएसी डब्यातून प्रवास करत होते. दिल्ली ते अटारीदरम्यान ही ट्रेन कोणत्याच स्थानकावर थांबत नाही.