नवी दिल्ली : युद्धामध्ये भारतानं आत्तापर्यंत चार वेळा पाकिस्तानला पराभवाची धूळ चारलीय. पुन्हा युद्ध झालं तरी पाकिस्तान कधीच जिंकू शकत नाही. पाकिस्तानचा भारतासमोर टिकावंच लागणार नाही. कारगिलसह आतापर्यंत चार वेळा युद्धामध्ये भारत आणि पाकिस्तान एकमेकांना भिडले. या चारही युद्धांमध्ये प्रत्येक आघाडीवर आपण पाकिस्तानला चारी मुंड्या चीत केलं. भारतानं पाकिस्तानच्या वर्मी घातलेले घाव अजूनही भरून निघालेले नाहीत. बांग्लादेशची निर्मिती पाकिस्तान अजूनही विसरलेला नाही.
अशा परिस्थितीत आता पाचव्यांदा युद्ध झालं तर आर्थिकदृष्ट्या कंगाल झालेला पाकिस्तान देशोधडीला लागू शकतो. सैन्यदलांचा लेखाजोखा मांडणाऱ्या 'सीपरी' या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या मते, शस्त्रास्त्रांच्या तुलनेत पाकिस्तान भारतापेक्षा खुपच पिछाडीवर आहे. भारताशी पाकिस्तानचा शस्त्र सज्जतेबाबत मुकाबलाच होऊ शकत नाही.
- भारतीय सैन्यदलात १२ लाखाहून अधिक सैनिक आहेत तर पाकिस्तानकडे केवळ ६.५३ लाख एवढंच सैन्यबळ आहे
- भारताकडे तब्बल ३ हजार ५६५ रणगाडे आहेत तर पाकिस्तानकडे केवळ १ हजार ४९६ रणगाडे
- भारताकडं तोफांची संख्या तब्बल ९ हजार ७१९ इतकी आहे तर पाकिस्तानकडे केवळ ४ हजार ४७२ तोफा आहेत
भारत केवळ जमिनीवरच पाकिस्तानला धूळ चाटायला लावत नाही तर आकाशातही पाकिस्तानला नेस्तनाबूत करण्याची धमक भारतीय वायुदलामध्ये आहे. दोन वेळा सर्जिकल स्ट्राइक करून भारतानं आपल्या या ताकदीची झलक पाकिस्तानला दाखवलीय.
- भारताकडे तब्बल १.२७ लाख वायुसैनिक आहेत तर पाकिस्तानकडे केवळ ६५ हजार
- भारताकडं २ हजार १८५ विमानांचा ताफा आहे तर पाकिस्तानकडे केवळ १ हजार २८१ विमानं आहेत
- त्यामध्ये लढाऊ विमानांची संख्या भारताकडं १ हजार ३९४ आहे तर पाकिस्तानकडं केवळ ७३०
- भारताकडं ७२० हेलिकॉप्टर्स आहेत तर पाकिस्तानकडे जेमतेम ३२८ हेलिकॉप्टर्स
यावरुनच भारताच्या लष्करी सामर्थ्याचा अंदाज येतो. पाकिस्तानसारख्या मुठभर देशाला भारत कधीही चिरडू शकतो. मात्र पहिला हल्ला करायचा नाही, ही भारताची आजवरची युद्धनीती असून भारत नेहमीच शांततेचा पुरस्कर्ता राहिलाय... मात्र शत्रू डोळे वटारणार असेल तर शत्रूच्या घरात घुसून त्याचा पुरता बिमोड करण्याची भारताची क्षमता आहे, हे कुणीही विसरू नये...