नवी दिल्ली : अनुच्छेद ३७०च्या मुद्द्यावर पाकिस्तान एकटा पडला आहे. पाकिस्तानने अनेक देशांकडे मदतीची मागणी केली. मात्र, आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची भूमिका भक्कम ठरली आहे. जम्मू आणि काश्मीर रज्याला विशेष दर्जा देणारा अनुच्छेद ३७० रद्द करण्याचा निर्णय पाकिस्तानला चांगलाच झोंबला आहे. या निर्णयाविरोधात पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच अनुच्छेद ३७० रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात पाकिस्तानने जगातील अनेक देशांकडेही मदतीची मागणी केली. मात्र या मुद्द्यावर पाकिस्तान एकटा पडला आहे.
युएई या प्रकरणामध्ये भारताच्या बाजूने असल्याचे दिसत आहे. तर मलेशियाने या प्रकरणावर आम्ही लक्ष ठेऊन असल्याचे म्हटले आहे. तुर्कीने या प्रकरणात पाकिस्तानची लवकरच मदत करु असे सांगत वेळ मारुन नेली आहे. तर काश्मीरबाबदच्या आमच्या भूमीकेत कोणताही बदल नसेल असे अमेरेकिच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते मॉर्गेन ऑर्टोगस यांनी म्हटले आहे. दरम्यान पाकिस्तानचे परराष्ट्र खात्याचे मंत्री शाहा महम्मद कुरेशी तातडीच्या बैठकीसाठी चीनला रवाना झाले आहेत.