मोदींचे ते पत्र अभिनंदनासाठी, चर्चेसाठी नव्हे; भारताकडून स्पष्टीकरण

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी वास्तवाचे भान बाळगूनच पुढे जायला हवे.

Updated: Aug 20, 2018, 02:04 PM IST
मोदींचे ते पत्र अभिनंदनासाठी, चर्चेसाठी नव्हे; भारताकडून स्पष्टीकरण title=

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इम्रान खान यांना पंतप्रधानपदी विराजमान झाल्याच्या शुभेच्छा देण्यासाठी पत्र पाठवले होते. यामध्ये द्विपक्षीय चर्चा सुरु करण्याबाबात कोणताही उल्लेख नव्हता, असे स्पष्टीकरण भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आले आहे. 

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री एसएम कुरेशी यांच्या विधानानंतर या वादाला तोंड फुटले. त्यांनी 'जिओ' वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना मोदींनी इम्रान खान यांना पत्र पाठवून द्विपक्षीय चर्चा पुन्हा सुरु करण्याचा प्रस्ताव ठेवल्याचा दावा केला होता. मात्र, भारताने हा दावा फेटाळून लावल्याने पाकचा खोटारडेपणा उघड झाला आहे. 

पंतप्रधान मोदी यांनी इम्रान खान यांना पत्र पाठवले आहे. भारत-पाक यांच्यातील खंडित झालेली चर्चा पुन्हा सुरु होण्याचे हे लक्षण आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी वास्तवाचे भान बाळगूनच पुढे जायला हवे. शेवटी हे दोन्ही देश एकमेकांचे शेजारी आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून दोन्ही देशांमध्ये काही प्रश्न प्रलंबित आहेत. याची जाण सगळ्यांना असून आपल्याकडे चर्चेशिवाय पर्याय नाही. याबाबतीत साहसवाद अंगीकारून चालणार नाही, असे कुरेशी यांनी सांगितले होते.