Cow Arrest For Murder: जगातील प्रत्येक देशात कोणता ना कोणता गुन्हा घडत असतो. यासाठी प्रत्येक देशाने कायदे तयार केले आहेत. गुन्हा सिद्ध झाल्यानंतर आरोपीला शिक्षेची तरतूद देखील आहे. मात्र आता तुम्ही एक बातमी वाचल्यानंतर आश्चर्याचा धक्का बसेल. कारण एका गायीला हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. तुम्हाला ही बातमी वाचून कदाचित आश्चर्य वाटेल, पण हे खरं आहे. खुद्द पोलिसांनीच या बातमीला दुजोरा दिला असून गायीला तसेच तिच्या मालकालाही ताब्यात घेतल्याचं सांगितलं आहे.
हे प्रकरण दक्षिण सुदानमधील लेक्स राज्यातील आहे. शेतात एका मुलावर हल्ला केल्याप्रकरणी एका गायीला अटक करण्यात आली आहे. डेली स्टारच्या वृत्तानुसार, गायीमुळे मुलाचा तिथेच मृत्यू झाला. यानंतर आता गायीला रुम्बेक सेंट्रल काउंटी पोलिस स्टेशनमध्ये आणण्यात आले आहे.
याआधीही प्राण्यांना सुदानमध्ये अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांच्यावर खटला चालवण्यात आला होता आणि नंतर त्यांना तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. काही वर्षांपूर्वी एका 45 वर्षीय महिलेच्या हत्येप्रकरणी एका मेंढीला अटक करण्यात आली होती, त्यानंतर तिच्यावर खटला चालवला गेला आणि शेवटी तिला तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.
मेंढीची शिक्षा पूर्ण झाल्यावर कायद्यानुसार ती मृत व्यक्तीच्या कुटुंबालाच दिली जाईल. इंडिपेंडंटने दिलेल्या वृत्तानुसार, सुदानमध्ये जर कोणत्याही पाळीव प्राण्याने एखाद्याला मारले तर शिक्षा संपल्यानंतर तो प्राणी मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई म्हणून दिला जातो.