close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

पंतप्रधान नरेंद्र मोदी जी ७ परिषदेत सहभागी होण्यासाठी फ्रान्सला रवाना

असमानता हा या परिषदेचा प्रमुख मुद्दा आहे.

Updated: Aug 25, 2019, 05:47 PM IST
पंतप्रधान नरेंद्र मोदी जी ७ परिषदेत सहभागी होण्यासाठी फ्रान्सला रवाना

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-७ परिषदेसाठी फ्रान्सला रवाना झाले आहेत. २४ ते २७ ऑगस्ट दरम्यान फ्रान्समध्ये होणाऱ्या या परिषदेसाठी जी-७ गटाचे सदस्य नसलेल्या काही देशांनाही आमंत्रित करण्यात आलं आहे. यात भारताचाही समावेश आहे. या परिषदेमध्ये मोदी-ट्रम्प यांच्यात द्विपक्षीय चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

भारताशिवाय काही मुदद्दयांवर पुढे जाणं शक्य नसल्याचं फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी स्पष्ट केलं आहे. 

या गटाच्या सात देशांशिवाय भारत, ऑस्ट्रेलिया, स्पेन, दक्षिण आफ्रिका, सेनेगल आणि रवांडा या देशांच्या प्रमुखांनाही निमंत्रण देण्यात आलं आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रेडो, जर्मिनीच्या चान्सलर अँजेला मार्केल, जवानचे पंतप्रधान शिंझो आबे, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युल मॅक्रॉन आणि इतर नेते या परिषदेत भेटतील. 

असमानता हा या परिषदेचा प्रमुख मुद्दा आहे. 

जी-७ परिषदेत या मुद्द्यांवर चर्चेची शक्यता

काश्मीर प्रश्न, जागतिक कॉर्पोरेट टॅक्स, अमेरिका-इराण तणाव, वातावरण बदल, भारताचा अणुप्रकल्प, युक्रेन प्रश्न आणि दहशतवाद या मुद्द्यांवर जी-७ परिषदेत चर्चा होण्याची शक्यता आहे.

नरेंद्र मोदी सध्या फ्रान्स, संयुक्त अरब अमिराती आणि बहरिनच्या दौऱ्यावर गेले आहेत. फ्रान्समध्ये होणारी जी-७ परिषद आटपून ते सोमवारी भारतात परतणार आहेत. मात्र, जेटलींच्या निधनामुळे पंतप्रधान मोदी तीन देशांचा परदेश दौरा अर्धवट टाकून माघारी फिरतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. 

नरेंद्र मोदी अबुधाबीत असताना त्यांना जेटलींच्या निधनाची बातमी समजली. तेव्हा त्यांनी जेटलींची पत्नी संगीता जेटली व मुलगा रोहन यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. मोदींनी या दोघांचे सांत्वन केले. त्यावेळी संगीता आणि रोहन जेटली यांनी, तुम्ही परदेश दौरा अर्धवट टाकून माघारी येऊ नका, अशी विनंती मोदींना केली. 

तुम्ही देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी परदेश दौऱ्यावर गेला आहात. शक्य असल्यास तुम्ही दौरा रद्द करु नका. देश हा सर्वात आधी येतो. त्यामुळे तुम्ही तुमचा दौरा पूर्ण करुनच परत या, असे जेटलींचा मुलगा रोहन याने मोदींना सांगितले. यानंतर पंतप्रधान कार्यालयानेही नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात कोणाताही बदल होणार नसल्याचे सांगितले.