Vladimir Putin : ज्याची भिती होती तेच झालं. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन युक्रेनला संपवण्यात गुंतलेत. मात्र त्यांच्या एका निर्णयामुळे जग विनाशाच्या उंबरठ्यावर उभं आहे. पुतीन यांनी अण्वस्त्रांसंबंधीचा रशियानं अमेरिकेसोबत केलेला करार मोडलाय. देशाला संबोधित करत पुतीन यांनी करार मोडल्याची घोषणा केलीय.
जर पुतिन यांनी युक्रेन युद्धात अण्वस्त्रांचा वापर केला तर जगात तिसरं महायुद्ध होण्यापासून कुणीच वाचवू शकत नाही. अमेरिकेसोबतच्या न्यू स्टार्ट पॉलिसीमुळेच पुतिन यांचे हात बांधले गेलेले होते.
यापूर्वी पुतीन यांना चीड आणतील अशा गोष्टी सातत्यानं अमेरिकेकडून झाल्या. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन ऐन युद्धकाळात युक्रेनची राजधानी कीवला पोहचले. इतकच नाही तर त्यांनी युक्रेनला 500 मिलियन डॉलरची अतिरिक्त मदत करत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष जेलेन्स्कींचं धैर्य वाढवलं. युक्रेननंतर बायडेन पोलंडची राजधानी वॉर्सामध्ये पोहचले आणि तिथूनही पुतीन यांच्याविरोधात एल्गार पुकारला
बायडन यांनी येणा-या वर्षात NATO देशांच्या बैठकीचं यजमानपद स्वीकारण्याची घोषणा केलीय, त्यामुळे पुतीन यांच्या जखमेवर मीठ चोळलं गेलंय. रशिया-युक्रेन युद्धात पहिल्यांदाच अमेरिकेनं इतकी उघड भूमिका घेतल्यानं जगावर तिस-या महायुद्धाचे ढग दाटलेत.