बापरे! इतकी थंडी की लोकांचे केस आणि पापण्या देखील गोठल्या

तुम्ही-आम्ही कल्पनाही करु शकणार नाही, एवढी प्रचंड थंडी या गावात आहे. जगातलं हे सगळ्यात थंड गाव आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Jan 18, 2018, 12:31 PM IST
बापरे! इतकी थंडी की लोकांचे केस आणि पापण्या देखील गोठल्या title=

सायबेरीया : तुम्ही-आम्ही कल्पनाही करु शकणार नाही, एवढी प्रचंड थंडी या गावात आहे. जगातलं हे सगळ्यात थंड गाव आहे.

हा तापमानाचा फलक पाहा. तब्बल उणे 62 तापमान. या गावात सगळं काही गोठून जातं. जमीन, पाणी, शाई, अन्न इतकंच काय डोळ्यांच्या पापण्याही गोठून जातात. 

 

Үлүйэ сыыстым, ычча. 14.01.18

A post shared by Сивцева (@sivtseva9452) on

जगातल्या या सगळ्यात थंड गावाचं नाव ओयमायकॉन. रशियातल्या सायबेरियामधलं हे गाव. एवढी बोचणारी थंडी असूनही या गावात लोकं राहतात. एवढ्या थंडीत घराबाहेर पडलं की डोळ्यांच्या पापण्याही गोठून जातात. तुमची पापणी लवूच शकत नाही.

या गावची लोकसंख्या जवळपास 500 आहे. 1920 च्या सुमाराला रेनडिअरना चरायला नेण्याची ही जागा होती. पण हळूहळू इथली लोकवस्ती वाढायला लागली. 1933 मध्ये इथे उणे 67.7 डिग्री सेल्सियस एवढ्या उच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली. एवढ्या थंडीत राहायचं म्हणजे इथल्या लोकांना क्षणाक्षणाला संघर्ष करावा लागतो. इथे पेनातली शाईही गोठून जाते. लोकांच्या चष्म्यावर दव पडलं की क्षणार्धात त्याचा बर्फ जमा होतो. इथल्या लोकांना त्यांच्या वाहनांचं इंजिन नेहमी सुरूच ठेवावं लागतं. ते बंद केलं की इंजिन गोठून जातं आणि बंद पडतं.

 

 

A post shared by Anastasia Gruzdeva (@anastasiagav) on

इथली जमीनही गोठून जाते. थंडीच्या मौसमात कुणाचा मृत्यू झालाच, तर मोठंच संकट उभं राहतं. संपूर्ण जमीन गोठल्यामुळे मृतदेह पुरणं अशक्य होऊन जातं. त्यासाठी आधी बर्फात आग लावावी लागते. आग लावून बर्फ वितळला की मग काही वेळानं जमीन खोदणं शक्य होतं. थंडीच्या मौसमात दिवसातले तब्बल 21 तास ओयमायकॉनमध्ये अंधार असतो. विशेष म्हणजे एवढ्या थंडीतही इथल्या शाळा सुरू असतात. एवढ्या थंडीत इथं काही पिकणं निव्वळ अशक्य. थंडीत इथले लोकं फक्त मांसाहार करतात. त्यातही फक्त घोडा आणि रेनडिअर यांचंच मास खाल्लं जातं. काही घरांत मासे साठवून ठेवतात.

 

 

 

A post shared by Anastasia Gruzdeva (@anastasiagav) on

ओयमायकॉनपासून जवळचं शहर याकुट्स्क. दुपारी अडीच वाजता इथलं तापमान आहे उणे पंचवीस अंश सेल्सियस. संध्याकाळचे पाच वाजताच तापमान तब्बल उणे 46 डिग्रीपर्यंत खाली येतं. बर्फाची वादळं इथं नेहमीचीच. त्यातून मार्ग काढत गाडी चालवावी लागते. थंडीचा कहर म्हणजे काय ते या गावात समजतं. उकळतं पाणी काही क्षणांत बर्फ होतो आणि उडून जातो.

थंडीच्या मौसमात कपडे वाळणं हे मोठंच आव्हान. चुकून एखादा कपडा बाहेर वाळत घातला तर त्या कपड्याचा बर्फ होतो आणि तो कपडा चक्क फाटून जातो. 

 

 

A post shared by Anastasia Gruzdeva (@anastasiagav) on

ओयमायकॉन या जगातल्या सर्वाधिक थंडीच्या गावाची ही सफर. इथलं जगणं खरंच आव्हानात्मक. क्षणाक्षणाला संघर्ष बर्फाशी. पण ओयमायकॉनचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या गावात कुणीच रडू शकत नाही. कारण रडण्यासाठी अश्रू बाहेर येतच नाहीत. तेही गोठूनच जातात. 

 

 

A post shared by Anastasia Gruzdeva (@anastasiagav) on