मॉस्को : रॅम्पवर कॅटवॉक करताना एका १४ वर्षीय रशियन मॉडेलचा मृत्यू झाला आहे. व्लादा दझूबा असे या मॉडेलचे नाव आहे. अतिप्रमाणात रॅम्पवॉक केल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याची चर्चा आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, व्लवादा चीन येथील एका कंपनीसोबत काम करत होती. या कंपनीसोबत झालेल्या करारानुसार ती शांघाय येथे पोहोचली होती. ही कंपनी या मॉडेलकडून सातत्याने मॉडेलिंग करून घेत होती. कंपनीच्या या प्रकारमुळे व्लादाने इतके कॅटवॉक केले की, ती बेशुद्ध होऊन रॅम्पवरच कोसळली. कोसळल्यावर तीला वैद्यकीय उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तोपर्यंत ती कोमात गेली होती. रशियातील पर्म सिटीमध्ये राहणारी व्लादा ही मध्यमवर्गीय कुटूंबातून या क्षेत्रात आली होती. आर्थिक स्थिती हालाकीची असल्यामुळे ती या क्षेत्रात आली होती.
गरीबीला कंटाळून मॉड़ेलिंग क्षेत्रात आलेल्या व्लादाची भेट एका चायनीज मॉडेलिंग कंपनीसोबत झाली. कंपनीने व्लादासोबत तीन महिन्यांचे करारबद्ध केले होते. या कराराबद्धल व्लादाच्या कुटूंबियांना माहिती नव्हते. तसेच, तिचे इतक्या प्रमाणात शोषण केले जात आहे याबाबतही तिच्या कुटुंबियांना माहिती नव्हती. व्लादाचे शेवटच्या फोनमधील मिळालेल्या संभाषणानुसार ती समोरच्या व्यक्तिशी बोलताना आपण प्रचंड थकले असल्याचे सांगताना आढळते. तसेच, माझी प्रकृती ठिक नसतानाही माझ्याकडून काम करून घेतले जात असल्याचे व्लादाने म्हटले आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, व्लादाकडून १२ ते १३ तास सलग काम करून घेतले जात असे. अतिप्रमाणात काम करेल्यामुळे तीची झोपही पूर्ण होत नसे. कॅटवॉक करताना अति थकव्यामुळे ती थेट रॅम्पवरच कोसळली. काही दिवस कोमात राहिलेल्या व्लादाचा अखेर मृत्यू झाला. व्लादाशी करार करणाऱ्या कंपनीने तिचा विमाही उतरवला नसल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. त्यामुळे रशीयाच्या पोलिसांनी या कंपनीविरूद्ध गुन्हा नोंदविल्याची माहिती आहे.