Pakistan New PM: पाकिस्तानात एकाच कुटुंबात जाणार पंतप्रधान आणि मुख्यमंत्रीपद; धाकटा भाऊ आणि मुलीला उमेदवारी

Pakistan New PM Shehbaz Sharif: पाकिस्तानचे नवे पंतप्रधान कोण होणार हे रहस्य अखेर उलगडलं आहे. नवाज शरीफ पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून माघारी हटले आहेत. शहबाज शरीफ पाकिस्तानचे नवे पंतप्रधान होणार आहेत.   

शिवराज यादव | Updated: Feb 14, 2024, 12:32 PM IST
Pakistan New PM: पाकिस्तानात एकाच कुटुंबात जाणार पंतप्रधान आणि मुख्यमंत्रीपद; धाकटा भाऊ आणि मुलीला उमेदवारी  title=

Pakistan New PM Shehbaz Sharif: पाकिस्तानचे पुढील पंतप्रधान कोण होणार? याचं उत्तर अखेर मिळालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार,पाकिस्तान मुस्लीम लीग नवाजने (PML-N) शहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांची पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून निवड केली आहे. पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज पक्षाने मंगळवारी रात्री उशिरा अध्यक्ष शहबाज शरीफ यांना पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी निवडलं. शहबाज शरीफ दुसऱ्यांदा पाकिस्तानचे पंतप्रधान होण्याच्या तयारीत आहेत. इम्रान खान यांचं सरकार कोसळल्यानंतर 2022 ते 2023 दरम्यान पीपीपीच्या पाठिंब्याने पंतप्रधान झाले होते. 

पाकिस्तानात झालेल्या राष्ट्रीय निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळालं नव्हतं. यामुळे देशात राजकीय अनिश्चितता निर्माण झाली होती. पण अखेर मंगळवारी या अनिश्चिततेला निर्णायक वळण मिळालं.  नवीन युती सरकारची स्थापना करत शहबाज शरीफ यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नामांकन देण्यात आलं. 

नवाज शरीफ यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाज (पीएमएल-एन) आणि बिलावल भुट्टो-झरदारी यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) यांनी स्वतंत्रपणे जागा कमी मिळालेल्या असतानाही बहुमत सरकार स्थापन करण्यासाठी युती केली आहे. 

पीएमएल-एनच्या प्रवक्ता मरियम औरंगजेब यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे की, "पक्षाचे अध्यक्ष नवाज शरीफ (74) यांनी आपले छोटे बंधू शहबाज शरीफ (72) यांनी पंतप्रधान पदासाठी आणि मुलगी मरियन नवाजला पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्रीपदासाठी उमेदवारी दिली आहे". पुढे त्या म्हणाल्या आहेत की, "नवाज शरीफ यांनी पीएमएल-एनला सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा देणाऱ्या सर्व राजकीय पक्षांचे आभार मानले आहेत. असे निर्णय पाकिस्तानला संकटातून बाहेर आणतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे".

मरियम नवाज शरीफ पंजाबच्या मुख्यमंत्रीपदासाठी पीएमएल-एनच्या उमेदवार असणार आहे. शहबाज शरीफ यांनी मरियन नवाज पंजाबच्या पहिल्या मुख्यमंत्री असतील असं पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. शहबाज शरीफ यांनी नवीन सरकार स्थापनेसंदर्भात पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेते आसिफ अली झरदारी आणि एमक्यूएम नेते खालिद मकबूल यांची भेट घेतली. शुक्रवारपर्यंत नवीन सरकार स्थापनेची चर्चा पूर्ण होईल असं सांगितलं जात आहे.

माजी पंतप्रधान इम्रान खान सध्या जेलमध्ये बंद असून पाकिस्तान तहरीफ-ए-इंसाफ वगळता सर्व प्रमुख पक्षांनी पीएमएल-एनच्या नेतृत्वात युतीचं सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं आहे. दुसरीकडे नवाज शरीफ कुटुंबाची वाईट प्रतिमा निर्माण होऊ नये यासाठी शहबाज शरीफ यांना खुर्चीवर बसवणार असल्याचं बोललं जात आहे. इम्रान खान यांच्या अपक्ष उमेदवारांनी बहुमताचा आकडा पार केला नसली तरी त्यांच्या मोठ्या विजयामुळे नवाज शरीफ चिंतेत आहेत. निवडणुकीत लष्कराची मध्यस्थी आणि निकालात छेडछाड केल्याचे आरोप होत आहेत. 

तुरुंगात असलेल्या इम्रान खान यांच्या अपक्ष नेत्यांनी सर्व अडचणींचा सामना करत 100 हून अधिक जागा जिंकल्या. नवाज शरीफ यांचा पक्ष पीएमएल-एन आणि बिलावल भुट्टो यांचा पक्ष पीपीपी यांना 100 चा आकडाही स्पर्श करता आला नाही. अशा परिस्थितीत बिलावल भुट्टो यांनी नवाज यांच्या पीएमएल-एनला बाहेरून पाठिंबा दिला आहे. ते स्वतः या शर्यतीत असले तरी पक्षाच्या लाजिरवाण्या कामगिरीमुळे त्यांनी ही तडजोड केल्याची चर्चा आहे.