गोल्ड मेडल हुकल्याने भडकला बॉडी बिल्डर, स्टेजवर केलेल्या कृत्याने आजीवन बंदी... Video व्हायरल

कोणताही खेळ म्हटला की हार जीत आलीच, पराभूत झालेल्या बॉडिबिल्डरने रागाच्या भरात केलेल्या कृत्यावर क्रीडा जगतातून संताप व्यक्त होत आहे

Updated: Jan 11, 2023, 01:52 PM IST
गोल्ड मेडल हुकल्याने भडकला बॉडी बिल्डर, स्टेजवर केलेल्या कृत्याने आजीवन बंदी... Video व्हायरल title=

Trending News : खेळ म्हटलं की हार जीत ही आलीच. कोणतीही स्पर्धा म्हटली की प्रत्येक खेळाडू हा जिंकण्याच्या उद्देशानेच खेळतो. पण प्रत्येकालाच जेतेपद मिळतं असं नाही. काही खेळाडू जेतेपद पटकावण्यात यशस्वी होतात. तर पराभूत खेळाडू नव्या उत्साहाने स्पर्धा जिंकण्याच्या तयारीला लागतात. यालाच खेळभावना म्हणतात. काही खेळाडू असे असतात की त्यांना पराभव पचवता येत नाही. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राष्ट्रीय बॉडिबिल्डिंग स्पर्धेत एका बॉडिबिल्डरने  (Body Builder) गोल्डमेडल (Gold Medal) हुकल्यानंतर केलेल्या कृत्यावर क्रीडा जगतात संताप व्यक्त केला जात आहे. 

काय आहे नेमका प्रकार?
बांगलादेशमध्ये राष्ट्रीय बॉडिबिल्डिंग स्पर्धेचं (Bangladesh National Body Building Championship) आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत बांगलादेशचा (Bangladesh) स्टार बॉडिबिल्डर जाहिद हसन शुवो (Jahid Hasan Shuvo) हा देखील सहभागी झाला होता. या स्पर्धेसाठी जाहिद शुवोने जबरदस्त तयारीदेखील केली. आपल्या पिळदार शरीरयष्टीच्या जोरावर शाहिद शुवोने अंतिम फेरीत धडक मारली. आपणच जेतेपद पटकावणार याचा प्रचंड आत्मविश्वास त्याला होता. 

स्पर्धेचा निकाल लागताच भडकला शाहिद
बांगलादेश राष्ट्रीय बॉडिबिल्डिंग स्पर्धेची अंतिम फेरी अगदी चुरशीची झाली. पंचांना निकाल जाहीर केला. शाहिद शुवोचं गोल्ड मेडल (Gold Medal) थोडक्यात हुकलं. त्याला सिल्व्हर मेडलवर (Silver Medal) समाधान मानावं लागलं. आपल्या पराभवानंतर शाहिद पंचांशी बोलायला गेला. पण पंचांनी त्याला बाजूला व्हायला सांगितलं. आपल्यावर जाणूनबुजून अन्याय केला जात असल्याचं वाटल्याने शाहित संतापला. 

शाहिदची चुकीची वर्तणूक
दुसऱ्या क्रमांकावर आलेल्या शाहिदला सिल्व्हर मेडल आणि मिक्सर मिळाला. पण संतापलेल्या शाहिदला हा निकाल मान्य नव्हता. पारितोषिक वितरण झाल्यानंतर रागात असलेला शाहिद पोडियमवरुन खाली उतरला आणि त्याने आपल्या गळातील सिल्व्हर मेडल काढून टाकलं. तसंच बक्षीस म्हणून मिळालेला मिक्सरही त्याने खाली फेकला. इतक्यावरच त्याचा राग शांत झाला नाही. त्याने त्या मिक्सरला लाथेने जोरदार किक मारत उडवून दिला. शाहिदचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral On Social Media) झाला आहे. 

शाहिदवर लागली आजीवन बंदी
शाहिदने केलेल्या कृतीवर क्रीडा जगतातून संताप व्यक्त केला जात आहे. खेळात हार जीत ही आलीच. पण शाहिदला आपला पराभव मान्य नव्हता. शाहिदच्या कृतीनंतर बांगलादेश बॉडिबिल्डिंग संघटनेने त्याच्यावर गंभीर कारवाई केली असून त्याला आजीवन बंदी घालण्यात आली आहे. शाहिद शुवो हा तीन वेळा राष्ट्रीय चॅम्पयनशिपचा गोल्ड मेडलिस्ट आहे. चौथ्या वेळीही आपल्यालाच गोल्ड मेडल मिळणार अशी त्याची भावना होती. पण यावेळी त्याची संधी हुकली.

शाहिदने दिलं स्पष्टीकरण
आपल्या केलेल्या कृत्यावर शाहिदने स्पष्टीकरणही दिलं आहे. आपण मॅच फिक्सिंगविरोधात हे कृत्य केल्यानचं त्याने म्हटलं आहे. ज्या बॉडिबिल्डरला गोल्ड मेडल मिळालं तो बांगलादेश फेडरेशनच्या उपाध्यक्षाच जावई आहे.