1995 साली Onlie पुस्तकांच्या विक्रीने सुरुवात, आज ऑनलाईन विश्वातील सर्वात टॉप कंपनी

वाचा Amazon Company च्या यशाची कहाणी, ऑनलाईन विश्वातील टॉपची कंपनी

Updated: Aug 15, 2022, 08:51 PM IST
1995 साली Onlie पुस्तकांच्या विक्रीने सुरुवात, आज ऑनलाईन विश्वातील सर्वात टॉप कंपनी  title=

Biggest Companies On Amazon : त्या काळात इंटरनेटच्या (Internet) जगापासून सामान्य लोकं फारसे परिचीत नव्हते. अशा काळात एक व्यक्तीने ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट (Online Shopping Website) सुरु करण्याचं धाडस दाखवलं.  त्या व्यक्तीने इंजिनिअरिंगनंतर अनेक बड्या कंपन्यांमध्ये नोकरी केली. पण नोकरीत त्याचं मन रमलं नाही. 

नोकरीदरम्यान त्याने अमेरिका पालथी घातली. यावेळी त्या व्यक्तीला लोकांना वस्तू खरेदी करण्यात अडचणी येत असल्याचं लक्षात आलं. त्याने मनाशी पक्कं केलं आणि स्वत:ची कंपनी सुरु केली. या कंपनीने संपूर्ण जग व्यापलं आहे. आज ही कंपनी  Amazon नावाने प्रसिद्ध आहे. ऑनलाईन विश्वातील टॉपची कंपनी. 

या यशामुळेच आज जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत त्यांचं नाव पहिल्या नंबरवर आहे. हे नाव म्हणजे जेफ बेझोस (Jeff Bezos). अॅमेझॉन सुरू करणाऱ्या जेफ बेझोस यांचा संगणक आणि तंत्रज्ञानावर नेहमीच मोठा विश्वास होता.

आज इंटरनेटचा वापर झपाट्याने वाढत आहे. पण 1990 च्या दशकाच्या सुरुवातीलाच जेफ बेझोस इंटरनेटशी संबंधीत व्यवसाय करण्याचं निश्चित केलं होतं. यातूनच त्यांना ऑनलाईन शॉपिंगची कल्पना सुचली.

पुस्तक विक्रीपासून केली सुरुवात
1994 ला अमेरिकेतल्या टेक्नोलॉजी हब सिएटलमध्ये (Hub Seattle) बेझोस यांनी Amazon ची स्थापना केली. त्यानंतर 1995 ला त्यांनी ऑनलाईन पुस्तक विक्रीने व्यवसायाची सुरुवात केली. सिएटलमध्ये बेझोस यांनी पत्नी मॅकेंजी हिच्या  साथीने 3 खोल्यांचं एक घर भाड्याने घेतलं. जगातल्या सर्वात मोठ्या ऑनलाईन शॉपिंग कंपनीचीही पायाभरणी होती. 

Amazon चा पहिला IPO 1997 मध्ये उघडला. त्यानंतर कंपनीने शेअरची किंमत $18 निश्चित केली होती, जी 1 वर्षातच $105 वर पोहोचली.

100 हून अधिक देशात कंपनीचा विस्तार
ब्रॅड स्टोनच्या 'द एव्हरीथिंग स्टोअर: जेफ बेझोस अँड द एज ऑफ अॅमेझॉन' या पुस्तकात दिलेल्या माहितीनुसार 1995 मध्ये कंपनी सुरु झाल्यापासून 1 महिन्याच्या आत अॅमेझॉनने 50 राज्य आणि 45 देशांमधून ऑनलाइन ऑर्डर घेतल्या. अॅमेझॉन कंपनीचे संस्थापक जेफ बेझोस जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. 1999 मध्ये टाइम मासिकाने त्यांना 'किंग ऑफ साइबर कॉमर्स' ही पदवी देऊन गौरवलं.

2012 मध्ये भारतात प्रवेश
ग्लोबल शिपिंग प्रोग्राम अंतर्गत अॅमेझॉन आज 100 हून अधिक देशांमध्ये सामानाचं वितरण करते. भारतात 2012 मध्ये कंपनीने प्रवेश केला, आणि अल्पावधीत अॅमेझॉनने भारतातही आपलं जाळं विस्तारलं. 

असं पडलं Amazon नाव
कंपनीचं नाव अॅमेझॉन कसं पडलं याची गोष्टही मोठी रंजक आहे. कंपनीचं नाव असं असावं की ती ऐकताच जगातील एक मोठी कंपनी असेल वाटावं, असं बेझोस यांना वाटत होतं. इंग्रजी वर्णमालेतील पहिल्या अक्षर 'A' ने नाव सुरू व्हावे, अशी त्यांची इच्छा होती. 

त्याने अनेक नावांचा विचार केला आणि शेवटी Amazon हे नाव निश्चित केलं. जगातल्या सर्वात मोठ्या नदीचं नाव Amazon आहे. अशीच विशाल आपली कंपनी असावी यासाठी बेझोस यांनी हे नाव ठरवलं.

मार्केट कॅप $1 ट्रिलियन 
Amazon कंपनी सुरु झाल्यानंतर 3 वर्षांच्या आतच कंपनीचे मार्केट कॅप $1 बिलियन पार गेले. ज्याची किंमत त्यावेळी 3,600 कोटी रुपये होती. Amazon ला 1 ते 100 अब्ज डॉलर्स पर्यंत पोहोचायला 14 वर्षे लागली. अखेर, सप्टेंबर 2018 मध्ये, Amazon चे मार्केट कॅप प्रथमच $1 ट्रिलियन पार गेलं. अॅमेझॉन सध्या मार्केट कॅपनुसार जगातील पाचवी सर्वात मोठी कंपनी आहे. सध्या कंपनीचे मार्केट कॅप $1.40 ट्रिलियन म्हणजेच 111 लाख कोटी रुपये आहे.

बेझोस यांनी सोडलं होतं CEO पद
27 वर्ष अॅमेझॉनच्या सीईओ पदावर राहिल्यानंतर 2021 मध्ये जेफ बेझोस यांनी हे पद सोडलं होतं. 

सन 2000 मध्ये बेझोस यांनी स्पेस ट्रेवल ब्लू ओरिजिन सुरू केलं. बेझोस यांनी स्पेस ट्रेवल क्षेत्रातल्या भविष्यातील शक्यतांबाबत अधिक माहिती देण्याची योजना आखली आहे. ब्लू ओरिजिनची स्पर्धा एलोन मस्कच्या स्पेस एक्सशी आहे. अॅमेझॉनचे सीईओ पदावरून पायउतार झाल्यानंतर, बेझोस आपला बहुतेक वेळ ब्लू ओरिजिन, बेझोस अर्थ फंड, अॅमेझॉन डे वन फंड आणि वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्रासाठी देत ​​आहेत.

पद सोडताच कंपनीच्या शेअरमध्ये घसरण
बेझोस यांनी सीईओ पद सोडल्यानतंर कंपनीच्या शेअर्समध्ये 32 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. या वर्षी कंपनीचं मार्केट कॅप 20 लाख कोटी रुपयांनी खाली आलं आहे. ऑनलाइन शॉपिंगच्या क्षेत्रात कंपनी अव्वल स्थानावर असून तिचे नेटवर्क जगभरात पसरलं आहे.