ज्यूरिख : सोन्याच्या किंमतीत दररोज वाढ होताना पहायला मिळत आहे. मात्र, असे असलं तरी सोन्याची खरेदी सर्वत्र मोठ्या प्रमाणात होते. पण, या जगात असा एक देश आहे जेथे सोनं चक्क नाल्यात आणि गटारीत वाहलं जातं.
जगभरातील संपन्न देशांपैकी एक असलेल्या स्वित्झर्लंडमधील नाल्यात आणि गटारीत चक्क सोनं वाहून दिलं जातं. संशोधकांनी गेल्यावर्षी केलेल्या संशोधनात तब्बल तीन टन चांदी आणि ४३ किलो सोनं गटारीत आढळलं. या सोनं-चांदीची किंमत तब्बल ३१ लाख डॉलर (जवळपास २० कोटी रुपये) आहे.
ही माहिती समोर आल्यानंतर, तेथील नागरिक आपल्या परिसरातील नाला-गटारीत सोनं-चांदी आणि इतर किमती ऐवज शोधणार त्यापूर्वीच संशोधकांनी स्पष्ट केलं आहे की, हे सर्व धातू सुक्ष्म कणांच्या रुपात मिळालं आहे.
हे सर्व सोन-चांदी आणि इतर धातू म्हणजे घडाळ, औषधं आणि रासायनिक कंपन्यांमधून निघाल्याचं बोललं जात आहे. कारण या कंपन्या आपल्या उत्पादनासाठी या धातुंचा वापर करतात.
सरकारने केलेल्या सर्वेक्षणाचे प्रमुख शोधकर्ता बेस वेरिएन्स यांनी सांगितलं की, "तुम्ही अशा व्यक्तींबाबात ऐकलं असेल ज्यांनी आपल्या टॉयलेटमध्ये महागडे दागिने फेकतात. मात्र, आम्हाला अशा प्रकारे कुठलेच दागिने आढळले नाहीत." सर्वाधिक सोनं पश्चिम स्विस क्षेत्राशी संबंधित आहे. असे मानलं जात आहे की, हे सोनं घड्याळ निर्माता कंपन्यांचं आहे. या कंपन्या महागड्या घड्याळांत सजविण्यासाठी सोन्याचा वापर करतात.