मलालावर गोळी झाडाणारा दहशतवादी पाक तुरुंगातून फरार

एहसानुल्लाह एहसानची एक ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झालीय

Updated: Feb 7, 2020, 11:08 AM IST
मलालावर गोळी झाडाणारा दहशतवादी पाक तुरुंगातून फरार title=
मलाला युसुफजर्ई (फाईल फोटो)

इस्लामाबाद : नोबल पुरस्कार विजेती मलाला युसुफजर्ई (Malala Yusufzai) हिच्यावर गोळी झाडून तिच्या हत्येचा प्रयत्न करणारा दहशतवादी पाकिस्तानच्या तुरुंगातून फरार झालाय. एहसानुल्ला एहसान असं या दहशतवाद्याचं नाव आहे. एहसानुल्लाचा पेशावरमधील शाळेवरच्या दहशतवादी (Peshawar school attack 2014)  हल्ल्यातही हात होता. २०१४ साली झालेल्या पेशावर शाळा हल्ल्यात तब्बल १३२ चिमुरडे ठार झाले होते. 

एहसानुल्लाह एहसानची एक ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झालीय. पाकिस्तान सिक्युरिटी एजन्सीच्या कैदेतून आपण ११ जानेवारी रोजी निसटल्याचं त्यानं या ऑडिओ क्लीपमध्ये म्हटलंय. सरेंडर करताना पाक सेनेनं आपल्याला दिलेला शब्द पाळला नसल्याचा आरोपही यामध्ये एहसाननं केलाय. 


एहसानुल्लाह एहसान (फाईल फोटो)

आपण पाक सेनेसोबत झालेल्या चर्चेनंतर ५ फेब्रुवारी २०१७ रोजी आत्मसमर्पण केलं होतं. मी या कराराचं तीन वर्षांपर्यंत पालन केलं परंतु, सुरक्षा एजन्सीनं कराराचं उल्लंघन करत माझ्या मुलांसह मला कैद केलं. त्यानंतर सुरक्षा एजन्सीच्या तावडीतून मुक्त होण्याचा मी निर्णय घेतला, असंही एहसानुल्लाह यानं म्हटलंय. 

अल्लाहच्या मदतीनं मी ११ जानेवारी रोजी कैदेतून निसटण्यात यशस्वी ठरलो, असंही त्यानं म्हटलंय. आपल्या कैदेबद्दल लवकरच एक विस्तृत माहिती जाहीर करणार असल्याचंही त्यानं घोषित केलंय. परंतु, यावेळी सध्या तो कुठे आहे याबद्दल मात्र त्यानं माहिती दिलेली नाही. 

पाकिस्तानच्या स्वात खोऱ्यात मलाला युसुफजई हिच्यावर २०१२ मध्ये मुलींच्या शिक्षण अभियानाला प्रोत्साहन देण्यासाठी गोळीबार करण्यात आला होता. यामध्ये मलाला गंभीर जखमी झाली होती.