५८५ कोटी खर्च करून थायलंडच्या राजाचे अंत्यसंस्कार

थायलंडचा राजा अदुल्यादेज भूमीबोल यांच्यावर गुरुवारी शाही अंत्यसंस्कार करण्यात आले. 

Updated: Oct 27, 2017, 11:25 PM IST
५८५ कोटी खर्च करून थायलंडच्या राजाचे अंत्यसंस्कार  title=

बँकॉक : थायलंडचा राजा अदुल्यादेज भूमीबोल यांच्यावर गुरुवारी शाही अंत्यसंस्कार करण्यात आले. १९२७साली जन्मलेल्या भूमीबोल अदुल्यदेज यांचं मागच्या वर्षी १३ ऑक्टोबरला निधन झालं होतं. त्यांच्या शाही अंत्यसंस्कारासाठी मागच्या एका वर्षापासून तयारी सुरु होती. भूमीबोल १९५०मध्ये थायलंडचे राजा बनले होते. पाच दिवस चाललेल्या या अंत्यसंस्कारामध्ये अडीच लाख लोक सहभागी झाले होते. अंत्यसंस्काराच्या आजूबाजूचा परिसर स्वर्गाच्या आधारावर बांधण्यात आला होता.

अंत्यसंस्कारासाठी १८५ फूट उंचीचा सोन्यासारखं चमकणारं स्मशान बनवण्यात आलं होतं. बँकॉकमध्ये झालेल्या अंत्यसंस्कारावेळी थायलंडच्या दिवंगत राजाचा शाही कलश अंतिम संस्कार कक्षामध्ये ठेवण्यात आला. 

राजाचं पार्थिव सोन्याच्या रथात ठेवून ग्रेट विक्ट्रीपासून स्मशानापर्यंत आणण्यात आलं. हा रथ तब्बल २२२ वर्ष जुना आहे. १७९५ साली बनवण्यात आलेला हा रथ शाही परिवारातल्या लोकांच्या अंत्यसंस्कारावेळी वापरला जातो. 

राजाचं पार्थिव सोन्याच्या पालखीमध्ये ठेवून स्मशानात आणण्यात आलं. बौद्ध परंपरेनुसार राजावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

राजाच्या अंत्यसंस्कारासाठीचं दोन किलोमिटरचं अंतर पार करायला तीन तास लागले. राजाचं पार्थिव स्मशानात पोहोचल्यावर तोफांची सलामी देण्यात आली. 

राजाच्या या अंत्यसंस्काराला ५८५ कोटी रुपयांचा खर्च आला. जगभरातला या सगळ्यात महागडा अंत्यसंस्कार आहे. राजाच्या मृत्यूनंतर थायलंडमध्ये एक वर्षाचा दुखवटा घोषीत करण्यात आला आहे. 

राजा भूमीबोल यांच्या मृत्यूनंतर युवराज माहा वाजीरालोंग्कोर्न थायलंडचा नवा राजा झाला आहे. युवराज माहा वाजीरालोंग्कोर्न चकरी वंशाचा १०वा सम्राट झाला आहे. 

राजा भूमीबोल यांच्या कार्यकाळामध्ये अनेकवेळा सैन्य तख्तपलट झालं होतं पण तरी नागरिक राजाला ताकद देत होते. राजाच्या अंत्यसंस्कारासाठी अडीच लाख लोक उपस्थित होते.