नवी दिल्ली : स्पेनची एक ट्रांसजेंडर महिला एंजेला पोंसने मिस स्पेन हा किताब जिंकून इतिहास रचला आहे. आता ती मिस युनिवर्स स्पर्धेत सहभागी होणार आहे. स्पेनकडून या स्पर्धेत सहभागी होणारी ही पहिली ट्रांसजेंडर महिला असेल.
एंजेला २६ वर्षांची आहे. स्पेनच्या सेविलात आयोजित केलेल्या राष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत २२ सौंदर्यवतींना मागे टाकत तिने मिस स्पेन हा किताब आपल्या नावे केला. मिस पोंस यावर्षअखेरीस फिलिपिन्समध्ये होणाऱ्या मिस युनिवर्स स्पर्धेत सहभागी होणार आहे. पोंसने इंस्टाग्रामवर आपला आनंद व्यक्त केला. तिने लिहिले की, स्पेनचे नाव आणि इथली संस्कृती जगासमोर सादर करण्याचे माझे स्वप्न आहे.
मिस वर्ल्ड संघटना ट्रांसजेंडर्सचा स्पर्धेत सहभागी होण्याची परवानगी देत नाही. म्हणूनच एंजेलाने सांगितले की, कमीत कमी माझ्या डोक्यावर मिस स्पेनचा ताज आहे, यामुळे मी समाधानी आहे. २०१२ मध्ये मिस युनिवर्सने घोषणा केली होती की, ते ट्रांसजेंडर ब्यूटी क्वीन्सना स्पर्धेत सहभागी होण्याची परवानगी देतील.
एंजेलाची उंची ५ फूट ९ इंच आहे. तिने ३ वर्षांची असल्यापासून महिला म्हणून स्वतःची ओळख केली आहे. ती आता मिस युनिवर्स २०१८ मध्ये स्पेनचे प्रतिनिधित्व करेल. यापूर्वी एंजेलाने केडिजकडून मिस वर्ल्ड स्पेन स्पर्धेत भाग घेतला होता. पण या स्पर्धेत मिस बर्सिलोना मिरिआ लालागुआना ने तिला पराजीत केले.
२०१२ मध्ये कॅनडाच्या २९ वर्षीय मॉडल जेना तालाकोवने कायदेशीर लढाई जिंकत मिस युनिवर्स स्पर्धा ट्रांसजेंडर्ससाठी खुली केली. कारण ती स्वतः ट्रांसजेंडर असल्याने तिला स्पर्धेत येण्यास मनाई केली होती.