Woman Swallows Apple AirPod: कामाच्या गडबडीत किंवा विसरभोळेपणामुळं कधी चुकीच्या गोळ्या किंवा औषधे घेतली अशा घटना अनेकांसोबत घडत असतात. मात्र, एका महिलेने औषधाच्या गोळीऐवजी चक्क एअरपॉड गिळले आहेत. तुम्हालासुद्धा हे ऐकून आश्चर्य वाटलं ना पण हे खरं आहे, अमेरिकेत राहणाऱ्या एका महिलेने चुकून चक्क एक आयपॉड गिळले आहेत. मात्र सुदैवाने या महिलेच्या जीवाला कोणता धोका निर्माण झाला नाही. वेळेतच आपली चूक लक्षात आल्यानंतर तिने डॉक्टरांकडे धाव घेतली. महिलेने स्वतःच हा किस्सा सांगितला आहे. तसंच, ही चूक आपण कशी काय केली, हेदेखील सविस्तर सांगितलंय.
न्यूयॉर्क पोस्टच्या एका रिपोर्टमुसार, अमेरिकेतील एका 52 वर्षीय टिकटॉकरने घडलेल्या या घटनेचा ऑनलाइन खुलासा केला आहे. तिने म्हटलं आहे की, व्हिटॅमिनची गोळी समजून तिने तिच्या पतीचे अॅपलचे इअरपॉड (Apple AirPod Pro) गिळले आहेत. महिलेचा हा अनुभव ऐकल्यानंतर सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. काहीजण हा अनुभव ऐकूनच आश्चर्यचकित झाले आहेत. या महिलेचे नाव रियाल्टार तन्ना बार्कर असं आहे. बार्कर सकाळी तिच्या मित्रांसोबत मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडली होती. मैत्रिणीसोबत गप्पा मारण्यात ती इतकी रमली की तिने हातात असलेले इअरपॉड गोळ्या समजून गिळले. हे अॅपलचे इअरपॉड तिच्या पतीचे होते.
तिने पुढे म्हटलं आहे की, फिरत असताना अर्ध्या रस्त्यातच तिने व्हिटॅमिनची गोळी खाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी तिने व्हिटॅमिनची गोळी समजून इअरपॉड तोंडात टाकले आणि पाणी प्यायली. मात्र, घशात काहीतरी अडकल्यासारखे वाटले म्हणून ती अजून पाणी प्यायली व पुढे निघाली. मैत्रिणीचा निरोप घेऊन ती घरी जायला निघाली. घरी निघत असताना ती आयपॉड घेण्यासाठी गेली तेव्हा तिच्या लक्षात आले की हातात आयपॉड नसून व्हिटॅमिनच्या गोळ्या आहेत. त्यानंतर सगळा प्रकार तिच्या लक्षात आला.
बार्कर पुढे म्हणाली की, हे इतक्या जलद गतीने झाले की मला काही सूचलंच नाही. मी असं काही करु शकते यावर माझा विश्वासच बसत नाहीये. आता माझ्या आत एक एअरपॉड आहे, हे किती विचित्र आहे. बार्करचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. अनेकांनी युजर्सनी तिला आता पुढे काय झालं याबाबतही प्रश्न विचारले आहेत.
बार्करने म्हटलं आहे की, मला जसं कळलं की मी इअरपॉड गिळलेत तेव्हा लगेचच मी डॉक्टरांकडे धाव घेतली. तेव्हा डॉक्टरांनी इअरपॉड नैसर्गिक पद्धतीने बाहेर पडू देत असा सल्ला दिला. तसंच, डॉक्टरांनी तिला काही प्रश्नदेखील केले आहेत. दोन इअरपॉड गिळलेत की एकच असही डॉक्टरांनी विचारलं होतं. कारण यात चुंबक असते. जर असं झालं असतं तर मोठी समस्या निर्माण झाली असती. मात्र, सुदैवानं तसं काही झालं नाही.
सोमवारी बार्करने अन्य एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात तिने तिच्या फॉलोवर्सना सांगितलं आहे की इअरपॉड नैसर्गिकरित्या बाहेर आले आहेत व ती सुरक्षित आहे.