बुखारेस्ट : सध्या सोशल मीडियाचं व्यसन सर्वांना लागलं आहे. ज्यामुळे आपल्या आजू-बाजूला नक्की काय घडत आहे यचा कुणाला पत्ता देखील लागत नाही. असचं काही झालं आहे रोमानिया येथे राहणाऱ्या महिलेसोबत. सोशल मीडियाच्या नादात जुळ्या मुलांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे मुलांचा 10 व्या मजल्यावरून पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जेव्हा महिला फेसबूक लाईव्ह करण्यात व्यस्त होती, तेव्हा जुळी मुलं खेळता-खेळता खाली पडली.
त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले तेव्हा देखील ही महिला सोशल मीडियावर व्यस्त होती. महिलेला पोलिसांकडून मुलांच्या मृत्यूची माहिती मिळाली. 'द सन'ने दिलेल्या रिपोर्टनुसार, रोमानियाच्या प्लॉइस्टी शहरात हा धक्कादायक अपघात झाला. एंड्रिया व्हायोलेटा पेट्रीस फेसबुकवर लाइव्ह स्ट्रीमिंगमध्ये व्यस्त होती जेव्हा तिचे जुळे मोईज ख्रिश्चन पेट्रिस आणि बीट्रिस-एरिका पेट्रिस 10 व्या मजल्यावरून खाली पडले.
तेव्हा देखील एंड्रिया फेसबूक लाईव्हमध्ये इतकी व्यस्त होती की तिला मुलांच्या ओरडण्याचा आवाज देखील आला नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीस एंड्रिया व्हायोलेटच्या घरी पोहोचले, तेव्हा देखील तिला मुलांच्या मृत्यूबद्दल कल्पना नव्हती. त्यानंतर पोलिसांनी तिला मुलांच्या मृत्यूची माहिती दिली.
नंतर, माध्यमांशी बोलताना, एंड्रियाने दावा केला की ती निर्दोष आहे. तिने सांगितले की ती तिच्या मोठ्या मुलासह दुसऱ्या खोलीत झोपली होती, तर दोन्ही मुले तिच्या मैत्रिणीच्या देखरेखीखाली होती. काही वेळानंतर ती तिथे पोहचली, तेव्हा तिला मुले बेपत्ता दिसली.
एंड्रियाने आपल्या मैत्रिणीला मोठ्या संकटात अडकवलं आहे. तिचं म्हणणं आहे की मुले खिडकीपर्यंत पोहोचू शकत नाहीत. मात्र, प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे की त्यांनी मुलांना खिडकीवर चढताना पाहिले. याप्रकरणी आता प्रत्येकजण एंड्रियाची टीका करत आहे.