Google Earth used For Find Car : भारतात गाडी चोरी (Stolen Car) होण्याचं प्रमाण गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. फक्त भारतातच नाही तर परदेशात देखील गाड्याची क्रेझ वाढल्याने कार विक्रीमध्ये मोठी वाढ झाल्याचं चित्र समोर आलं होतं. अशातच आता ब्रिटनमधून (UK Crime News) एक थरारक प्रकार समोर आला आहे. 23 वर्षीय इंजिनिअर तरुणाने टेक्नॉलॉजीची मदत घेऊन आपली चोरीला गेलेली कार शोधून काढली. गुगल अर्थ (Google Earth) आणि स्नॅपचॅटच्या (Snapchat) मदतीने त्यांनी आपली कार शोधून पोलिसांना देखील चकित केलंय. जेय रॉबिन्सन असं या तरूणाचं नाव असून, त्याने कशा प्रकारने गाडी शोधली, पाहुया...
जेय रॉबिन्सन हा ब्रिटनमध्ये राहणारा होतकरू तरुण आहे. त्याने नुकतंच इंजिनियरिंग पूर्ण केलं होतं. सीट (Seat) आणि फॉक्सवेगन गॉल्फ (Volkswagen Golf) अशा दोन गाड्या चोरीला गेल्या होत्या. त्यानंतर जेयला टेन्शन आलं. त्याने तात्काळ पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी चौकीत तक्रार नोंदवून घेतली अन् तपास सुरू केला. मात्र, दोन दिवस झाले तरी काहीच समोर आलं नाही, पोलिसांना याबाबत कोणतेही धागेदोरे मिळाले नाहीत. त्यानंतर जेयने स्वत:च तपास सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्याने सर्वप्रथम सोशल अकाऊंटवर माहिती शेअर केली.
सगळीकडं शोधलं पण गाडी काही मिळेना. त्यानंतर जेयने त्याच्या स्नॅपचॅटला देखील गाडी हरवल्याची पोस्ट टाकली. त्यानंतर त्याच्या जेमी नावाच्या मित्राचा त्याला फोन आला. तुझी गाडी मी पाहिलीये, असं त्याने जेयला सांगितलं. त्यानंतर स्नॅपचॅटच्या मदतीने संपर्क साधण्यात आला. मात्र, कार परत करण्यासाठी तब्बल 2000 पाउंड किंमत मागितल्याने जेनला काय करावं कळेना झालं. त्यानंतर त्याने कारचा पत्ता शोधण्याचा निर्णय घेतला. गाडीचा फोटो नेमका कुठं काढलाय? याची माहिती जेयला हवी होती. त्याने 'रिव्हर्स इमेज सर्च'ची मदत घेतली.
रिव्हर्स इमेज सर्चच्या माध्यमातून त्याला बाजूची इमारत दिसली. मात्र, ही जागा नक्की कुठं आहे? याचा पत्ता लागत नव्हता. त्याचवेळी त्याला एक कचऱ्याचा डब्बा दिसला. त्या कचऱ्याच्या डब्ब्यावर जवळच्या हाऊसिंग सोसायटीचं नाव होतं. आत्ता सुट्टी नव्हती. गुगल अर्थच्या मदतीने सोसायटीचा पत्ता सापडला. जेयने पोलिसांना सोबत घेतलं अन् चोराच्या मुसक्या आवळल्या आणि जेयला त्याची सीट पुन्हा मिळाली. जेयला पहिली गाडी मिळाली असली तरी अद्याप त्याला त्याची फॉक्सवेगन गॉल्फ मिळाली नाही. त्याचा तपास अजूनही सुरू आहे. माझ्याकडे असलेल्या चावीने ती गाडी लगेच अनलॉक झाली, तेव्हा माझी खात्री पटली की ती माझीच सीट आहे, अशा भावना जेय रॉबिन्सन याने व्यक्त केल्या आहेत.