अमेरिकेत कोरोनाचा कहर; मृतांचा आकडा एक लाखाच्या पार

आतापर्यंत तब्बल १६ लाख अमेरिकन नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. 

Updated: May 28, 2020, 07:51 AM IST
अमेरिकेत कोरोनाचा कहर; मृतांचा आकडा एक लाखाच्या पार

वॉशिंग्टन: अमेरिकेतील कोरोना (Coronavirus) बळींच्या संख्येने एक लाखांचा टप्पा ओलांडला आहे. 'जॉन हॉपकिन्स'ने दिलेल्या माहितीनुसार देशात आतापर्यंत १,००,०४७ जण कोरोनामुळे मृत्युमुखी पडले आहेत. अमेरिकेत २० जानेवारीला कोरोनाचा पहिला रुग्ण मिळाला होता. यानंतर अमेरिकेत कोरोना व्हायरस झपाट्याने पसरला. आतापर्यंत तब्बल १६ लाख अमेरिकन नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. ही संख्या अजूनही वाढताना दिसत आहे. 

न्यूयॉर्क हे अमेरिकेतील कोरोनाच्या प्रादुर्भावाचे मुख्य केंद्र ठरले आहे. अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांची मुख्यालये असलेल्या न्यूयॉर्कमध्ये आतापर्यंत ३०  हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. न्यूयॉर्क, न्यू जर्सी, कॅलिफोर्निया, इलिनोयस आणि मॅसेच्युसेटस या पाच राज्यांतील बळींची एकत्रित संख्या ५५ हजार इतकी आहे. 

पहिल्यांदाच रेड झोनमधून आलेल्या 'या' प्राण्याला केलं क्वारंटाईन

कोरोना बळींच्या जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या इंग्लंडमध्ये आतापर्यंत ३७ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील मृतांची संख्या ही इंग्लंडच्या तिप्पट आहे. तरीही गेल्या काही दिवसांत अमेरिकेतील अनेक राज्यांकडून लॉकडाऊनचे नियम शिथील करण्यात आले आहेत.

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही सगळी परिस्थिती भयानक असल्याचे म्हटले होते. मात्र, सरकारने वेळीच केलेल्या उपाययोजनांमुळे अधिक हानी टळल्याचा दावाही त्यांनी केला. मात्र, अनेक तज्ज्ञांनी ट्रम्प यांच्या वक्तव्याला छेद देणारे अंदाज वर्तविले आहेत. परिस्थिती अशीच राहिली तर अमेरिकेतील ५० ते ६० लाख लोकांना कोरोनाची लागण होईल. तर १४ लाख लोकांचा मृत्यू होण्याची भीतीही वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, भारतात आतापर्यंत कोरोनाचे १,४५,३८० रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ४१६७ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ६०४९० जण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत.