विजय मल्ल्याचे मोदींना प्रत्युत्तर, बँकांना सांगा पैसे स्वीकारायला!

मोदी यांनी नाव न घेता विजय मल्ल्यावर निशाणा साधला. त्यानंतर लगेचंच मल्ल्यानं एका पाठोपाठ एक टि्वट करुन उत्तर दिले आहे.

Updated: Feb 14, 2019, 11:46 PM IST
विजय मल्ल्याचे मोदींना प्रत्युत्तर, बँकांना सांगा पैसे स्वीकारायला! title=

नवी दिल्ली : सोळाव्या लोकसभेत संसदेतील शेवटच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाव न घेता कर्जबुडव्या विजय मल्ल्यावर निशाणा साधला. त्यानंतर लगेच मल्ल्याने एका पाठोपाठ एक टि्वट करुन उत्तर दिले आहे. एक व्यक्ती ९ हजार कोटी रुपये घेऊन देशाबाहेर पळाला असं पंतप्रधान मोदी लोकसभेतील भाषणात म्हणाले. पण त्यांनी नावाचा उल्लेख केला नाही. त्यांचा रोख मात्र माझ्याकडे होता. ते चांगले वक्ते आहेत. मी जे पैसे द्यायला तयार आहे. ते स्वीकारण्याचे बँकांना निर्देश देत नाहीत ?  असं मी अत्यंत विनंतीनं मोदींना विचारु इच्छितो, असंही त्याने म्हटले आहे.

किंगफिशरला दिलेल्या कर्जाची वसुली केल्याचे श्रेय पंतप्रधान घेऊ शकतात असे मल्ल्याने टि्वटमध्ये म्हटले आहे.कर्जाच्या परतफेडीसंबंधी आपण कर्नाटक उच्च न्यायालयात प्रस्ताव ठेवला होता. तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करु शकत नाही. तो माझा प्रामाणिक प्रयत्न होता. आता निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. किंगफिशर एअरलाईन्सला दिलेले पैसे बँकांनी का घेतले नाहीत? असा सवाल मल्ल्यानं टि्वटमधून केला आहे.

दरम्यान, मी माझी संपत्ती लपवून ठेवली, असा ईडीचा दावा आहे. माझ्याकडे लपवलेली संपत्ती असती तर कोर्टासमोर मी १४ हजार कोटी रुपयांची संपत्ती कशी जाहीर केली, असा सवाल मल्ल्याने केला आहे. विजय मल्ल्या देशातला पहिला फरार आर्थिक गुन्हेगार आहे. तो बँकांचे ९ हजार कोटी रुपये बुडवून ब्रिटनला फरार झाला. आता विजय मल्ल्याला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.