वडापावच्या व्यवसायातून 'हा' तरुण कमावतो करोडो रुपये !

वडापाव खायचा तर मुंबईत. इतकं मुंबईकरांचं आणि वडापावच घट्ट नातं आहे.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Oct 10, 2017, 10:49 PM IST
वडापावच्या व्यवसायातून 'हा' तरुण कमावतो करोडो रुपये ! title=
फोटो सौजन्य: सोशल मीडिया

मुंबई : वडापाव खायचा तर मुंबईत. इतकं मुंबईकरांचं आणि वडापावच घट्ट नातं आहे. चवदार, पोटभर आणि खिशाला परवडणारा अशी वडापावची ओळख आहे. मात्र हाच वडापाव लंडनमध्ये विकून दोन भारतीय तरुण कोट्यवधीश झाले आहेत. सुजय सोहानी या तरुणाने आर्थिक मंदीमुळे २००९ मध्ये आपली नोकरी गमावली. लंडनमधल्या एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये तो फूड अँड ब्रेव्हरेज मॅनेजर म्हणून काम करायचा. बेरोजगारीमुळे अनेक प्रश्न त्याच्या समोर आ वासून उभे राहिले. त्यामुळे त्याने लंडनमध्ये स्वतःच व्यवसाय सुरु करण्याचे ठरवले. 

मित्राच्या मदतीने त्याने व्यवसाय सुरु केला. मित्राच्या सकारात्मक प्रतिसादामुळे आणि सहकार्यामुळे त्याने व्यवसायास सुरुवात करण्याचे ठरवले. हे दोघेही मुंबईचे. एकाच कॉलेजात शिकलेले. खाद्यपदार्थाचा व्यवसाय करण्याचे ठरवल्यानंतर नेमक्या कोणत्या व्यवसायाची विक्री करायची ? हा प्रश त्यांना पडला. मग वडापाव हा पदार्थ ठरला. ‘हफिंग्टन पोस्ट’ च्या वृत्तानुसार एका आईस्क्रीम पार्लरमध्ये भाड्याने जागा घेऊन सुबोध आणि सुजयने वडापावचा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला मोफत वडापाव देऊन ग्राहकांची मने जिंकली. हळूहळू उत्पन्न वाढू लागल्यानंतर या दोघांनीही पदार्थांची यादी वाढवत नेली. २०१० मध्ये त्यांनी ‘श्रीकृष्ण वडापाव’ नावचं भारतीय हॉटेल सुरु केलं.

वडापावसोबतच दाबेली, समोसा, भेळ, कचोरी, भजी, पाणीपुरी, रगडा पॅटीस यासारख्या पदार्थांची देखील विक्री करायला सुरूवात केली. सात वर्षांच्या परिश्रमानंतर त्यांना आता या व्यवसायातून वर्षाकाठी ४ कोटींहून अधिक रुपयांचा फायदा होतो.