तुम्ही नाराज आहात का? सुधीर मुनगंटीवार स्पष्टच बोलले, म्हणाले 'कालपर्यंत माझं नाव असताना...'

भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने नाराज असल्याची चर्चा आहे. मात्र त्यांनी आपण नाराज नसल्याचं स्पष्ट केलं आहे. कालपर्यंत नाव असताना ते नाव कमी का केलं हे मला माहिती नाही असंही त्यांनी सांगितलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Dec 16, 2024, 04:31 PM IST
तुम्ही नाराज आहात का? सुधीर मुनगंटीवार स्पष्टच बोलले, म्हणाले 'कालपर्यंत माझं नाव असताना...' title=

महाराष्ट्राच्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर झाला असून, रविवारी महायुतीच्या 39 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. दरम्यान यावेळी अनेक जुन्या चेहऱ्यांना डावलण्यात आलं आहे. यामध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांचाही समावेश आहे. काही लोकांना मंत्रिमंडळात स्थान न देण्यामागे विशिष्ट मानस आहे. केंद्राने सुधीर मुनगंटीवार यांच्याबाबत काहीतरी विचार करुनच मंत्रिमंडळात घेतलं नसेल असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. दरम्यान सुधीर मुनगंटीवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आपण नाराज नसल्याचं स्पष्ट केलं आहे. पण यावेळी त्यांनी कालपर्यंत नाव असताना ते नाव कमी का केलं हे मला माहिती नाही अशी शंकाही उपस्थित केली. 

"मी नाराज असण्याचं कारण नाही. मी कधीच व्यथित होत नाही. पक्ष जे पद देतं त्या पदासाठी मी काम करतो. फक्त इतकीच इच्छा आहे की, मंत्रिमंडळात माझं नाव आहे असं सांगण्यात आलं आणि काल ते नव्हतं इतकाच मुद्दा आहे. कालपर्यंत नाव असताना ते नाव कमी का केलं हे मला माहिती नाही. बाकी मला याबद्दल काही माहिती नाही. मंत्री म्हणून मी कॅबिनेटमध्ये मी गोरगरिंबाचे विषय मांडायचे, आता विधानसभेत मांडेन," असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत. 

देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानाबद्दल विचारलं असता त्यांनी सांगितलं की, "यांनाच सर्व माहिती असेल. त्यांना काही सांगितलं असेल तर मला उत्तर देण्याची गरज नाही". नितीन गडकरी यांच्या भेटीबद्दल विचारलं असता त्यांनी सांगितलं की, "एका छोट्या भावाची मोठ्या भावासह होणारी ही भेट आहे. जेव्हा असे प्रसंग येतात तेव्हा मी त्यांचं मार्गदर्शन घेतो. त्यांचं मार्गदर्शन उचित असतं". 

"जेव्हा मी आणि चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा मुख्यमंत्री म्हणून प्रस्ताव दिला तेव्हा श्रद्धा आणि सबुरीचा सल्ला दिला होता. तेच मार्गदर्शन आता करण्यात आलं आहे," असं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं. विधानसभेत गोरगरिंबाचे प्रश्न मांडायचे हेच आता माझं पुढील ध्येय आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. 

पुढे ते म्हणाले, "मी नाराज कधीच राहत नाही. काल जे आपल्याकडे होतं ते उद्या जाणार आहे. उद्या आपल्याकडे नाही ते परवा येणार आहे याची मला जाणीव आहे. ज्यांच्या कुटुंबातील मुलगा दुसऱ्या पक्षाच्या चिन्हावर उभा राहतो, आपण त्यांना मंत्री करु शकतो. आणि मी एका निष्ठावान कार्यकर्त्यासाठी गेलो म्हणून माझ्यावर राग काढतील. पक्ष असा संकुचित विचार कधीच करत नाही".

जेव्हा वेळ देतील तेव्हा देवेंद्र फडणवीसांची भेट होईल. अजून आमचं काही बोलणं झालेलं नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. आता मी कोणाशी बोलण्याचं कारण नाही. सध्या मी विधानसभेच्या औचित्याच्या मुद्द्याचा अभ्यास करत आहे. विधानसभेत विदर्भाच्या प्रशानासाठी काय मांडायचं याची पूर्वतयारी करत आहे. मी मंत्री नाही, आमदार आहे. ज्या मतदारांनी निवडून दिलं, त्यांच्यासाठी लढाई सुरु राहणार आहे असंही त्यांनी सांगितलं. तसंच केंद्रात वर्णी लागण्याची दूरपर्यंत नाही असं ते म्हणाले आहेत.