छगन भुजबळांचं करायचं काय?

 महाराष्ट्रातल्या प्रमुख राजकीय पक्षांना पडलेला एक प्रश्न हाच की, छगन भुजबळांचं करायचं काय? 

Updated: Aug 27, 2019, 02:43 PM IST
छगन भुजबळांचं करायचं काय?  title=

प्रसाद काथे, झी मीडिया, मुंबई : महाराष्ट्रातल्या प्रमुख राजकीय पक्षांना पडलेला एक प्रश्न हाच की, छगन भुजबळांचं करायचं काय? कारण, भुजबळ जिथं आहेत तिथं त्यांच्यासाठी आता अडगळीतली जागा ठरलेली आहे. पक्ष नेतृत्वाच्या वारसदार सुप्रिया सुळे यांचा फोन भुजबळ यांनी घेतला नाही. सुप्रिया सुळे संवाद यात्रेनिमित्ताने भुजबळ यांच्या प्रभाव क्षेत्रात पोहचल्या होत्या. आपल्या राजकीय कार्यक्रमात स्थानिक नेता नसण्याची नामुष्की टाळण्यासाठी भुजबळ यांना सोबत घ्यायचा प्रयत्न त्यांनी केला. तो यशस्वी झालेला नाही. त्या बदल्यात, जाणाऱ्यांना शुभेच्छा अशी खोचक, पुणेरी टिपणी करताना सुप्रिया सुळे यांचं दुखावलेपण उघड झालं.

छगन भुजबळ शांतपणे झालं प्रकरण बघत बसलेले असणार. तूर्त त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही. अंगी नाना कळा असलेला हा नेता. बालवयात हमाली केलेला, मेहनत करताना पाठीवर चाबकाचे फटके सोसलेला, महाविद्यालयीन जीवनात अमजद खानला एकपात्री अभिनय स्पर्धेत हरवणारा, शिवसेनेच्या मुशीत तयार होत मनोहर जोशींकडून हरलेला, शरद पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेला आणि आता तीच पाठ सोडायची जुळवाजुळव करणारा हा नेता. शोधलं तर भुजबळ यांच्या व्यक्तिमत्वाचे असे अनेक पैलू समोर येतील.

संघर्षाला नकार न देणे, राजकीय महत्त्वाकांक्षा लपवून न ठेवणे आणि बदलत्या परिस्थितीला ओळखून निर्णय घेणे हे भुजबळांना जमलं आणि त्याचीच किंमत त्यांनी कायम मोजली. म्हणूनच, आता डोळे मिटून भुजबळ म्हणजे काय असं शोधलं तर आयुष्याचा जमाखर्च जुळवायचं गणित ते सोडवत बसलेले तुम्हाला दिसतील. त्यांना अजूनही राजकीय हिशेब चुकू द्यायचे नाहीएत. मुलगा पंकज आणि पुतण्या समीर यांच्या वाटचालीला मोकळी वाट करून देताना स्वतःच्या डोक्याला शांतता हवीय. 

मध्यंतरी, बाळासाहेब ठाकरेंच्या विरोधातील खटले मागे घेऊन त्यांनी शिवसेनेला नरम केलं. स्वतःचे समर्थक सेनेतून निवडून आणले. पण, नंतर भाजपाला अंगावर घेऊन डोकेदुखी कायम ठेवली. त्यामुळे लागलेल्या आर्थिक घोटाळ्याच्या चौकशीतून सोडवायचे मार्ग भुजबळांना आता लवकर शोधायचे आहेत. पण, कर्म आणि त्याचा परिणाम कुणाला चुकत नाही.

दिवाकर रावते यांना भुजबळ शिवसेनेत असताना दक्षिण मुंबईत समुद्राकाठी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये भेटले. भुजबळ जाणार याची कुणकुण मातोश्रीवर लागली होती. त्याची आदेशानुसार चाचपणी रावते यांनी केली. भुजबळ यांनी अभिनयाचं कौशल्य पणाला लावलं आणि आक्षेप हाणून पाडला. पण, तिथून बाहेर पडलेले भुजबळ शिवसेनेत परतले नाहीत, हे ही खरं. भुजबळ तिथून आजतागायत थोरल्या पवारांशी एकनिष्ठ राहिले. पण, तीच त्यांची मर्यादा ठरली. अजित पवार यांच्याशी मनानी जुळवू न शकलेल्या जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील, विजयसिंह मोहिते या गटाचे ते म्होरके झाले. अजित दादांशी जुळवायची भूमिका घेतलेल्या आर आर आबांशी त्यांचा उभा दावा असायचा. सत्ता आणि सत्तेतील संघर्ष त्यांच्या पाचवीला पुजलेला. 

शिवसेनेत मनोहर जोशी आणि राष्ट्रवादीत आर आर पाटील यांच्याकडून पाठीला माती लागल्याने भुजबळ यांचा या दोन्ही नेत्यांच्या समाजाशी असलेला 'प्रेमळ संवाद' लपलेला नाही. सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना मराठा समाजाच्या कंत्राटदारांना स्पर्धेतून वेचून बाहेर काढल्याचा आरोप त्यांच्यावर लागला. हा मामला पुढे इतका वाढला की, नाशिक जिल्ह्याच्या राजकारणात बस्तान बसवताना भुजबळ यांच्यासमोर मराठा लॉबी दत्त म्हणून उभी ठाकली. आजही तीच एकजूट भुजबळांच्या घरवापसीला विरोध करत आहे. याच्या जोडीला, समता परिषदेच्या आडून बलुतेदारांच्या एकत्रिकारणाचा प्रयत्न आणि जातीनिहाय जनगणनेच्या आकडेवारीला उघड करायची मागणी हे स्वबळ वाढवण्यासाठी होतं हे ही लपून राहिलेलं नाही. 

आता हेच सगळं छगन भुजबळ यांच्यासमोर आव्हान म्हणून उभं राहिलं आहे. नाशकातला ओबीसी विरुद्ध मराठा हा संघर्ष भुजबळ यांच्या नाशकात यायच्या आधीपासूनचा. पण, भुजबळ इथं आल्यावर त्याला धार आली आणि जे जे त्या धारेचे वार झेलत राहिले ते आता पलटवार करायची संधी शोधत आहेत.

छगन भुजबळ बाहेर पडल्यानंतर शिवसेनेत ज्यांनी मोकळा श्वास घेतला ते आता सत्तेत कॅबिनेट मंत्रीपदी आहेत. छगन भुजबळ सत्तेतून बाहेर पडल्यानंतर अनेक कंत्राटदार आणि त्यांच्यावर वरदहस्त ठेवणारे अनेकजण गल्लीसम्राट होऊ शकलेत. नाशिकची जबाबदारी घेऊ पाहणारे नवे मनसबदार आहेत. या सगळ्यांनाच भुजबळ यांच्या परतण्याची अडचण आहे. छगनराव आले तर आपलं दुकान बंद हा साधा सरळ हिशेब त्यांना विरोध करायला कारणीभूत आहे. "बाबांनो, मी शांत बसेन" असं भुजबळांनी स्टॅम्पपेपरवर जरी लिहून दिलं तरी यातील कुणीच ते मान्य करणार नाही. कारण, भुजबळांना जशी आपल्या वारशाची सोय लावायची आहे तशीच या सगळ्यांना पण करायची आहे. तेव्हा, संघर्ष अटळ आहे. हा संघर्ष करता येणार नाही असं ज्यांना वाटतं ते उद्धव ठाकरेंच्या कानाला लागलेत आणि ज्यांना संघर्ष शक्य वाटतोय त्यांनी आपलं ठाणं बांधायला घेतलं आहे. यात, सत्ताधारी गटाला भुजबळांची उपयुक्तता ओळखून निर्णय घ्यायचाय. भुजबळ कधीही कासऱ्याला हिसडा देऊ शकतात याचं भान ठेवत तो निर्णय होईल.
समाप्त

- लेखकाचे हे वैयक्तिक मत आहे. झी मीडिया या मताशी सहमतच असेल असे नाही. तसेच या मताशी झी मीडियाचा कोणताही संबंध नाही.