close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

ब्लॉग : रोज अनुभवसंपन्न करणारी लोकलची गर्दी (भाग-२)

लोकलमधल्या गर्दीत येणारे अनुभव...

ब्लॉग : रोज अनुभवसंपन्न करणारी लोकलची गर्दी (भाग-२)

लोकलमधल्या गर्दीत अनेक चांगले-वाईट अनुभव येत असतात. पण मुंबईतल्या लोकलच्या गर्दीतूनही बरंच काही शिकण्यासारखं असतं. लोकलमधल्या गर्दीतलं असंच काही वेगळेपण 'झी २४ तास'च्या वृत्तनिवेदिका आणि निर्मात्या सुवर्णा धानोरकर यांनी या ब्लॉगमधून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

सुवर्णा धानोरकर, मुंबई : मुंबईच्या लोकलमधून प्रवास करताना या गर्दीत फोनवर मोठमोठ्यानं बोलणाऱ्या अनेक व्यक्ती भेटतात. वेस्टर्न लाईन म्हटलं की गुजराती महिलांची संख्या अधिक दिसते. त्यांचं फोनवरच संभाषणही ऐकण्यासारखंच असतं. कुणाची तमा न बाळगता त्या बिनधास्त बोलतात. कोणी परदेशातल्या पिकनिकविषयी बोलत असतं, तर कुणी आणखी काही. पण एक विषय या गप्पांमध्ये मला कॉमन दिसला तो म्हणजे शॉपिंगचा. या गर्दीत कधी एखादी मुलगी चक्कर येऊन पडली की लगेचच तिच्या मदतीला अनेक जण धावतात. आणि मग सुरु होतात महिलांचे सल्ले. 'या आजकालच्या मुलींना खायला नको' हा त्यातला महत्वाचा मुद्दा. ही गर्दी त्वेषानं भांडते पण मदतीला जिव्हाळ्यानं आणि प्रेमानं धावते. या गर्दीत कुणाचंच कुणाशी रक्ताचं नातं नसतं पण लोकलमुळे सगळे एकमेकांशी बांधलेले असतात. या गर्दीत कधी कोणाची तब्येत बिघडते तर कधी याच गर्दीत नवा जीवही जन्माला येतो. मग त्या जीवासाठी प्रत्येकीला मायेचा पान्हा फुटतो. चार चौघींना स्वत:ची बाळंतपणं आठवतात. मग बाळंतपणाच्या गप्पा रंगतात.

या गर्दीत अनेक खेळाडू देखील पाहायला मिळतात. मोठी बॅग सांभाळत ट्रेनमध्ये चढतात. त्यांना पाहून गाडीत बसलेल्या बाकीच्यांचा चेहरा काहीतरी भयंकर घडल्यासारखा होतो. नव्यानं मुंबईत आलेल्या मुलीपण या गर्दीत सामावून जातात. गर्दीतला एक चेहरा बनतात. या मुलींचा एक हमखास प्रश्न असतो की ते स्टेशन कुठल्या बाजूला येईल. सुट्टीच्या दिवशीच अशीच गोंधळलेली गर्दी असते. एखादी मोठी गॅंग फर्स्ट क्लासमध्ये चढते. कुणीतरी सांगतं, 'ये फर्स्ट क्लास है टीसी आयेगा तो फाईन देना पडेगा'. मग त्या भांबावून जिवाच्या आकांतानं धावपळ करतात, धडपडतात आणि कशाबशा जनरल डब्यात चढतात. कधी अर्धी गॅंग चढते, अर्धी स्टेशनातच राहते. मग गाडीत चढलेल्या गॅंगला संपूर्ण गर्दी सांभाळून घेते पुढे काय करायला हवं त्याचे सल्ले देते. कधी या सुट्टीच्या गर्दीत नको तेही घडून जातं, कुणाचा तरी हात सुटतो आणि होत्याच नव्हतं होतं. मग ही गर्दी स्तब्ध होते.

असंच होत्याचं नव्हतं करायचा प्रयत्न आजवर दहशतवाद्यांनीही केलाय. या दहशतवादाला हीच गर्दी सडेतोड उत्तर देते. एकमेकांच्या मदतीला धावते. अशा वेळी ही गर्दी. गर्दी भासत नाही. ती एक कुटूंब बनते. प्रत्येकाला जपते. माझी जखम ही या गर्दीची जखम होऊन जाते. या कठीण प्रसंगी सगळ्यांचे हात हातात असतात. जणू काही, येऊ दे कितीही दहशतवादी आम्ही करु त्यांचा मुकाबला. असंच जणू काही तो अनुभव असतो. अशा वेळी कोणालाच कोणाशी बोलायचं नसतं आणि प्रत्येकालाच प्रत्येकाशी बोलायचं असतं.

या गर्दीत कधी कोणी बायकोला सोडायला आला असतो तर कोणी आपल्या बहिणीला. बॅगा, मुलं सांभाळत ती सुट्टीसाठी निघालेली असते. तिच्या चेहऱ्यावर वेगळीच चमक असते. त्यावेळी तिच्याकडे पाहून ऑफिसला जाणाऱ्या प्रत्येकीला असं वाटून जातं की आपण स्वत:चं सुट्टीवर जातोय की काय, एवढ्या विचारानंही मन प्रसन्न होऊन जातं. कधी कधी नवऱ्याशी भांडून माहेरी जाणारीही या गर्दीत विंडो सीटला बसलेली दिसते आणि तो बिचारा प्लॅटफॉर्मवरून खिडकीत उभा राहून तिची समजूत घालत असतो. आजूबाजूच्या बायकांना त्याची दया येते. ती कशी चुकीची वागतेय असं वाटून जातं. कधी तर याच गर्दीत एखादी गुपचूप पळून जाणारी मुलगीही असते. तिची नजर खूप काही सांगून जाते.

दुपारच्या गर्दीत टीसींची वर्दी असतेच. अशावेळी फर्स्ट क्लासमध्ये बसून जनरलच तिकीट बाळगणाऱ्या मुलींची अॅक्टिंग बघण्यासारखी असते. टीसी ट्रेनमध्ये चढला की माझी नजर डब्यातल्या प्रत्येकीवर असते. अशावेळी माझीच माझ्याशी पैज लागते. 'ती जरा भांबावलीये, म्हणजे जनरलच तिकीट असणार किंवा मग तिकीट काढायचं विसरली असेल किंवा पास संपला असेल.' एकीच्यातरी बाबतीत माझ्याशीच लावलेली पैज मी जिंकते. अशा मुलींची फजिती पाहता पाहता एकदा माझीपण फजिती झाली. टीसीच्या तावडीत सापडले. पास संपला हे मी विसरलेच होते. पास पाहिल्यावर लक्षात आलं, मग काय थेट शरणागती. त्याचा फायदाच झाला. 'तू प्रामाणिकपणे स्वतःहून सांगितलंस त्यामुळे मी तुला १०० रुपयांची पावती फाडते. नाहीतर ३५० रुपये घेतले असते. अगं पास संपला तरी अरेरावी करणाऱ्या असतात. असे प्रामाणिक प्रवासी कमीच भेटतात गं.' तीचं शेवटचं वाक्य संपलं आणि खूप आनंद झाला. मी हरिश्चंद्र नाही. पण खरं बोलायची भीती वाटत असेल तर मग आवर्जून खरंच बोलायचं. हे कायम मनाशी ठरवलेलं असतं. त्यामागे एक प्रामाणिक कारण म्हणजे मेरी याददाश थोडी कमजोर है. मग खोटं बोलून फटका बसण्यापेक्षा खरं बोललेलं उत्तम.

याच दुपारच्या गर्दीतला हमखास भेटणारा प्रवासी म्हणजे प्रभादेवीहून चढणारा एक किन्नर. सापळ्याला लाजवेल एवढा बारीक आणि मस्तानीलाही लाजवेल एवढा गोरागोमटा. प्रत्येकीच्या डोक्यावर हात ठेऊन काहीतरी पुटपुटतो. पैसे मात्र दोन-तीन जणीच देतात. आणखी एक जोडी माहिमवरून चढते. पैसे मागत नाही. दरवाज्यात उभे राहून मस्त गाणी म्हणतात. गळा इतका गोड आहे की एखाद्या रिऍलिटी शोमध्ये गेले तर निश्चित जिंकतील.

एक एक स्टेशन ओलांडत असताना काही स्टेशन्सवर बटाटे वड्यांचा, सामोशांचा खमंग वास पण येतो. प्रभादेवी स्टेशनवर गाडी दाखल व्हायला लागली की पहिल्या पुलाजवळच सामोशाचं दुकान आहे. तिथे लोकांचा गराडाच असतो. पहाटेपासून या दुकानावर प्रवाशांची गर्दी. इथून गाडी जाताना समोशांचा खमंग वास येतो आणि भूक चाळवते. तोंडाला पाणी सुटतं. तशी मी समोसे वगैरे फारसे खात नाही, पण प्रभादेवी स्टेशनवरचे या दुकानातले सामोसे, चिंचपोकळीतल्या शगुनमधले सामोसे आणि चंद्रपुरातल्या मामा सामोसेवाल्याकडचे गरमागरम सामोसे म्हणजे माझा विकपॉईंट. मामा सामोसेवाल्याकडे जिलेबीही भारीच. असो विषयांतर नको.

कधीतरी गर्दीत एखादी गरोदर महिला चढते तिला बसायला जागा देण्यासाठी मग प्रत्येकीची धडपड. तिलाही मग आपण कुणीतरी ग्रेट असल्याचा फिल येतो. पण काही वेळेला चित्र अगदी उलट. तिला बसायला जागा द्यायचं सोडून सल्ले दिले जातात. इतक्या गर्दीत ट्रेनने कशाला जायचं. कोणीतरी तिला जागा देईल असा विचार करून कोणीच उठत नाही आणि ती बिचारी तशीच उभी राहते. दोन जीवांना सांभाळत.

काही जणी याच गर्दीत पोटपूजाही करतात. कुणी भेळ खातं, कुणी बिस्किट, बर्गर, फ्रँकी तर कोणी मुंबईतलं अस्सल खाणं वडापाव खात असतं. अनेक जणी तर घरुनच डब्यात आणलेलं काहीतरी खातात. पोटपूजा सुरू असताना हमखास आजूबाजूच्या काहीजणींना भुकेची जाणीव होते. पण पर्याय नसतो. दरम्यानच्या काळात एखादी सुंदर तरुणी लोकलमध्ये शिरते आणि सगळ्यांचं लक्ष वेधून घेते. कौतुक करावं इतकी सुंदर! ही सुंदरा सगळ्यांच्याच मनामध्ये भरते. मनातल्या मनात साऱ्याजणी तिचं सौंदर्य पाहून कौतुक करतात.
 
अजुनही भन्नाट किस्से आहेत या गर्दीतले तेही लवकरच...

(क्रमशः)