'संजय' म्हटलं... तर चर्चा तर होणारच...

विलियम शेक्सपियर म्हणाले होते, नावात काय आहे ?

Updated: Jul 31, 2019, 08:44 PM IST
'संजय' म्हटलं... तर चर्चा तर होणारच...    title=

संजय पाटील, झी मीडिया, मुंबई : आपली ओळख ही नावामुळेच असते. नावामुळे सजीव निर्जीव प्रत्येकाला आपली स्वतंत्र अशी ओळख आहे. विलियम शेक्सपियर म्हणाले होते, नावात काय आहे ? पण या वाक्यामुळेच त्याचं नाव आज देखील घेतलं जातं. नाव असा करा की, नाव घेताच काम होऊन जाईल असं आज म्हटलं जातं.

आपल्याकडे नावाला फार महत्व दिले जाते. नव्या जन्मलेल्या बाळाचं नाव काय ठेवायचं इथूनच ही डोकेदुखी सुरु होते. मग वेगळं काही तरी नाव ठेवण्याची शोधा-शोध सुरु होते. काही नाव अशी आहेत की अशा नावांची महाराष्ट्रात सर्वाधिक माणसं आहेत. विशेष म्हणजे या नावाच्या माणसांच्या नावालाच अधिक वलय प्राप्त आहे. चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही बाजूने. 

बॉलिवूडचा संजूबाबा म्हणजे संजय दत्तचा ६० वा वाढदिवस. संजय या नावाला वादाची किनार आहे. अगदी तुम्ही कोणत्याही क्षेत्रातील संजय नावाची व्यक्ती घ्या. ती व्यक्ती कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहिली आहे. अशाच काही वादग्रस्त वा चर्चेत असणाऱ्या क्रीडा, राजकारण, शिक्षण, बॉलिवूड यासारख्या क्षेत्रातील संजय नावाच्या व्यक्तींची आपण यानिमित्ताने जाणून घेणार आहोत.

संजय हे नाव पौराणिक काळापासून आहे. विशेष म्हणजे या नावाची माणसं देखील सर्वाधिक आहेत. नागपूर येथे २०१४ साली करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात ६ कोटी २८ लाख लोकांचा डेटा जमा करण्यात आला. आधार इनोव्हेशन लॅबने दिलेल्या आकड्यांनुसार, महाराष्ट्रात सर्वात जास्त 'संजय' या नावाचे सर्वाधिक लोकं आहेत. महाराष्ट्रात संजय नावाचे एकूण ६ लाख १४ हजार ५५७ ईतकी माणसं आहेत.

या निवडक संजयपैकी काही संजय नावाचे असे देखील व्यक्तीमत्वे आहेत. जे काही कारणांमुळे चर्चेत राहतात. चर्चेत असलेल्या या संजयांपैकी काही निवडक संजय बद्दल आपण जाणून घेणार आहोत.

महाभारतातील संजय, संजय दत्त, संजय राऊत, संजय निरुपम, संजय देशमुख आणि संजय मांजरेकर. यांनी आपापल्या क्षेत्रात खूप नावं कमावलं आहे. नाण्याला दोन बाजू असतात. त्याचप्रकारे मानवी जीवनात सुद्धा प्रत्येक माणसाच्या दोन बाजू असतात. एक चांगली आणि दुसरी वाईट. तसेच इथेही संजय नावाच्या बाबतीत असचं काहीसं आहे.

महाभारतातील संजय

महाभारतातील संजय आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध होते. धृतराष्ट्राला योग्य सल्ला द्यायचं काम ते करायचे. संजय यांना दिव्यदृष्टी प्राप्त होती, त्यामुळे युद्धक्षेत्रावरील सुरु असलेल्या गोष्टी ते महालात बसून राजांना सांगत होते. अंध धृतराष्ट्राने महाभारत युद्धाची प्रत्येक घटना संजयच्या वाणीने ऐकली होती. धृतराष्ट्राला युद्धाची माहिती देण्यासाठी व्यास मुनींनी संजयला दिव्य दृष्टी प्रदान केली असल्याची दंतकथा आहे.

संजय दत्त (बॉलिवूड)

संजय दत्तने 'रॉकी' या चित्रपटातून बॉलिवूड मध्ये पदार्पण केले. संजय दत्तने १९९३ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याप्रकरणी अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी ५ वर्षाची शिक्षा झाली. याआधी त्याने दीड वर्षाची शिक्षा भोगली. एप्रिल २०१३ पासून साडेतीन वर्ष पुण्यातील येरवडा कारागृहात काढले. याशिक्षेदरम्यान अनेक वेळा संजय दत्त पॅरोल वर बाहेर यायचा. यामुळे देखील संजय दत्त चांगलाच चर्चेत राहिला.

तुरुंगवास भोगत असताना संजय दत्तच्या वैयक्तिक जीवनाची ही जोरदार चर्चा झाली. भाऊंनी कामचं तसं केलं होतं. एक नाही, दोन नाही, भाऊंनी तब्बल तीन लग्न केले. संजय नावाला असलेल्या प्रसिद्धीत संजयने असे करुन आणखी भर घातली.
 
संजय दत्तला 'वास्तव' या सिनेमासाठी फिल्मफेयर मिळाला होता. 'वास्तव' आणि 'लगे रहो मुन्ना भाई' या सिनेमातून तो आणखी चमकला. 'लगे रहो मुन्ना भाई' मधून त्याने गांधीगिरी शिकवली. संजय दत्तच्या जीवनावर आधारित 'संजू' बायोपिक २३ जून २०१८ साली प्रदर्शित झाला.

संजय राऊत (राजकारण)

संजय राऊत हे शिवसेनेचे राज्यसभा खासदार आणि दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक. अंडी आणि कोंबडीला शाकाहारीचा दर्जा द्यावा, अशी भन्नाट मागणी संजय राऊत यांनी केली होती. यानंतर त्यांना सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल करण्यात आले होते. तसेच अनेक मीम्स आणि उपरोधिक टीका देखील करण्यात आली होती. 

संजय राऊत यांनी लिहिलेल्या सामना संपादकीयाची दखल राष्ट्रीय माध्यमांना घ्यावी लागते. आम्ही सत्तेला लाथ मारु, राजीनामा प्रकरण, मोदींवरील टीका या विषयावरील वक्तव्यामुळे संजय राऊत नेहमीच चर्चेत असतात.

संजय निरुपम (राजकारण)

संजय निरुपम नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत गजानन किर्तीकर यांच्याकडून पराभूत झाले. 2004 च्या लोकसभा निवडणुकीत संजय निरुपम यांनी उत्तर पश्चिम मतदार संघातून शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. त्यावेळेस त्यांच्यासमोर काँग्रेसचे दिवंगत सुनील दत्त यांचे आव्हान होते. सुनील दत्त यांनी संजय निरुपम यांचा ४७ हजार ३५८ इतक्या मताधिक्यांनी पराभव केला होता.

संजय निरुपम यांचा २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत गोपाळ शेट्टी विरोधात उभे होते. या निवडणुकीत गोपाळ शेट्टीने संजय निरुपमचा जवळपास ३ लाख ५० हजाराच्या मताधिक्याने पराभव केला. पण इतक्या मताधिक्याने पराभूत झाल्यामुळे देखील संजय निरुपम चर्चेत आले होते.

उत्तर भारतीयांमुळे मुंबई चालते. त्यांनी जर काम करायच बंद केलं, तर मुंबई बंद पडेल असं वक्तव्य करुन संजय निरुपमांनी पुन्हा एकदा वाढ ओढवून घेतला होता.

राज्यसभेवर पहिल्यांदा ते शिवसेनेकडून तर दुसऱ्यांदा काँग्रेसकडून निवडून गेले. त्यानंतर उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून २००९ साली खासदार म्हणून निवडून गेले. आपल्या सुरुवातीच्या काळात संजय निरुपम शिवसेनेच्या मुखपत्र असलेल्या हिंदी भाषेतील 'दोपहर का सामना' चे संपादक होते. संजय निरुपम वादग्रस्त शो बिग बॉसच्या २ पर्वातही सहभागी झाले होते.

डॉ. संजय देशमुख  (शिक्षण)

मुंबई विद्यापीठाच्या निकालातील अभूतपूर्व गोंधळामुळे कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांच्यावर कारवाई करुन कुलगुरुपदावरुन हटवण्यात आले. मुंबई विद्यापीठाच्या इतिहासात कारणे दाखवा अशी नोटीस पदरी पाडणारे देशमुख हे पहिलेच कुलगुरू.

राजभवनाने दिलेल्या मुदतीत पेपर तपासणी न झाल्याने मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली.

ऑनलाईन मुल्यांकन पद्धतीमुळे निकाल लागण्यास फार विलंब लागला होता. यामुळे अखेरच्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला होता. तसेच उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे देखील एक शैक्षणिक वर्ष वाया गेले.  

संजय देशमुख यांची जेव्हा कुलगुरुपदी निवड झाली तेव्हा ते सर्वात तरुण कुलगुरु होते. डॉ. संजय देशमुख यांनी १९९० साली मुंबई विद्यापीठातून वनस्पतीशास्त्रात पीएचडी प्राप्त केली. १९९०-९५ या पाच वर्षात चेन्नईच्या एम एस स्वामीनाथन संशोधन केंद्रामध्ये कोस्टल सिस्टीम रिसर्च प्रोग्रामचे संशोधक म्हणून काम केलं.

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु म्हणून डॉ. संजय देशमुख यांनी ७ जुलै २०१५ ला कुलगुरुपदाचा पदभार स्वीकारला. २०१६-१७ साली पहिल्यांदाच ऑनलाईन पद्धतीने उत्तरपत्रिका तपासण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे पुढे जे काही झालं ते फार भयानक होत.

संजय गांधी (राजकारण)

संजय गांधी हे माजी पंतप्रधान इंदिरा गांधींचे पुत्र होते. संजय गांधींच राजकीय जीवन फार वादग्रस्त राहीलं. संजय गांधी हे अमेठीतून लोकसभेवर खासदार म्हणून निवडून गेले होते. 

तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधीनी १९७५ साली आणीबाणीचा निर्णय घेतला. या निर्णया मागचे खरे सूत्रधार संजय गांधी होते. १९७६ साली संजय गांधींनी नसबंदी मोहीम हाती घेतली होती. नसंबदीचा हेतू पूर्ण व्हावा यासाठी लोकांना पकडून आणले जायचे. यामुळे काँग्रेसवर नोठ्या प्रमाणात टीका झाली होती.

१९७१ साली पंतप्रधान इंदीरा गांधी यांनी, सामान्य माणसाला परवडेल अशी गाडी निर्माण करण्याचे आदेश दिले होते. यानुसार जुलै १९७१ साली मारुती मोटर्स लिमिटेड या कंपनीची स्थापना करण्यात आली. या कंपनीचे प्रबंधक आणि डायरेक्टर हे संजय गांधी होते.

संजय मांजरेकर (क्रीडा)

टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर. संजय मांजरेकर नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान वादात सापडले होते.

संजय मांजरेकरांनी रविंद्र जडेजावर ट्विटरद्वारे टीका केली होती. यानंतर खऱ्या अर्थाने जडेजा-मांजरेकर यांच्यात वाकयुद्ध पाहायला मिळालं. रविंद्र जडेजा हा 'बिट्स ऍण्ड पिसेस' खेळाडू असल्याचं संजय मांजरेकर म्हणाले होते.

युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांनी इंग्लंडविरुद्धच्या मॅचमध्ये खराब कामगिरी केली. यानंतर एका स्पिनरला काढून जडेजाला संधी द्यावी का, असा प्रश्न मांजरेकर यांना विचारण्यात आला होता. तेव्हा 'मी थोडी बॅटिंग आणि थोडी बॉलिंग करु शकणाऱ्या जडेजासारख्या खेळाडूंचा चाहता नाही. असं त्यांनी म्हटलं होतं.

जडेजा हा सध्या त्याच्या ५० ओव्हरच्या कारकिर्दीमध्ये असा खेळाडू आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये मात्र तो पूर्ण बॉलर आहे. ५० ओव्हरच्या क्रिकेटमध्ये मी टीममध्ये बॅट्समन आणि स्पिनरना संधी देईन', असं मांजरेकर म्हणाले होते.

संजय मांजरेकरच्या या टीकेला रविंद्र जडेजाने प्रत्युतर दिले. 'मी तुझ्यापेक्षा दुप्पट मॅच जास्त खेळलो आहे, आणि अजूनही खेळत आहे. ज्यांनी काही साध्य केलं आहे. त्यांचा आदर करायला शिका. तुझी वाचाळ बडबड खूप ऐकली', असं ट्विट जडेजाने केलं होतं.      

असेही सर्वाधिक संजय 

नुकताच महाराष्ट्राचा राज्यमंत्रिमंडळ विस्तार झाला. यात संजय कुटे यांना कॅबिनेट तर संजय भेगडे यांना राज्यमंत्री पद देण्यात आले. लोकसभा निवडणूक 2019 मध्ये वंचित बहुजन आघाडीकडून संजय हेडाऊ, संजय भोसले आणि संजय सुखदान तर शिवसेनेकडून संजय जाधव आणि संजय मंडलिक. राष्ट्रवादीकडून संजय दिना पाटील तर भाजपकडून संजय धोत्रे आणि संजयकाका पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती.  

आपल्याकडे "नावं" ठेवण्याची पद्धत नवी नाही. वादग्रस्त गोष्टींमुळे ही मंडळी आणखी प्रसिद्ध झाली. ते म्हणतात ना, बदनाम हुवे तो क्या हुवा नाम तो हुवा. तसेच बॅड पब्लिसिटी इस गुड पब्लिसिटी असं देखील म्हणतात.