बांग्लादेश : बांगलादेशविरोधातील कसोटी सामन्यात पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर हॉटेलला परतणा-या ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमला एका धक्कादायक घटनेला सामोरे जावे लागले. टीमच्या बसवर अज्ञाताने हल्ला केल्यानंतर एकच खळबळ उडाली. या हल्ल्यात बसच्या खिडकीची काच फुटल्याची माहिती समोर येत आहे.
'स्टेडिअमहून हॉटेलकडे जात असताना कोणीतरी बसच्या दिशेने दगड फेकला, ज्यामुळे बसच्या खिडकीची काच फुटल्याचे ऑस्ट्रेलियाचे व्यवस्थापक सीन कॅरोल यांनी सांगितले. 'स्थानिक सुरक्षा अधिका-यांसोबत सुरक्षेसंदर्भात चर्चा केली जात आहे. या घटनेचा तपासही केला जात असल्याचे ते म्हणाले.
अचानक झालेला हा प्रकार धक्कादायक होता. अज्ञात व्यक्तीने हा दगड फेकला होता. पण यामध्ये कोणीही जखमी झाले नसल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान स्टेडिअमपासून ते हॉटेलपर्यंतच्या रस्त्यावरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे', अशी माहिती सीन कॅरोल यांनी दिली आहे.