नवी दिल्ली : विश्वचषकात भारतीय संघाचा सामना पाकिस्तान संघासोबत होणार की नाही? यावर जोरदार चर्चा रंगतेय. याबद्दल आयसीसी काय भूमिका घेते, त्याकडे अनेकांचे लक्ष वेधले होते. दहशतवादाला थारा देणाऱ्या पाकिस्तान संघाविरोधात क्रिकेट लढती स्थगित करण्यात याव्यात, अशी बीसीसीआयने मागणी केली होती. आयसीसीने ही मागणी फेटाळून भारताला पाकिस्तानासोबत खेळावे लागणार असल्याचे स्पष्ट केले आहे. विश्वचषकात भारताचा सामना पाकिस्तानसोबत न झाल्यास भारतीय संघालाच नुकसान होणार असल्याचेही त्यांनी म्हटले.
पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४० सैनिकांना त्यांचा जीव गमवावा लागला होता. यासाठी पाकिस्तान पूर्ण जबाबदार आहे, अशी बाजू बीसीसीआयने मांडली होती. यासाठी बीसीसीआयने आयसीसीला पत्र पाठवून दहशतवादाला थारा देणाऱ्या पाकिस्तान विरोधातील क्रिकेट सामन्यांना स्थगिती द्यावी, अशी मागणी केली होती. मात्र आयसीसीने ही मागणी फेटाळली आहे.
'या प्रकरणांमध्ये भूमिका घेणे हे आयसीसीचे कार्य नाही. या संदर्भातील निर्णय सरकारी स्तरावर घेतला जाऊ शकतो. परंतु आयसीसीकडे याबाबत कोणतीही नियमावली नाही' असे आयसीसीआयने स्पष्ट केले आहे. एवढेच नव्हे तर, विश्वचषकात जर भारताने पाकिस्तानसोबत खेळण्यास नकार दिला, तर पाकिस्तानच्या संघाला संपूर्ण गुण दिले जाणार. त्यामुळे भारतीय संघाचे नुकसानच होईल, असे आयसीसीच्या आधिकाऱ्यांनी बीसीसीआयला बजावून सांगितले.