नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) दहावीच्या गणित आणि बारावीच्या अर्थशास्त्र विषयाचा पेपर फुटल्याचं समोर आलं आणि एकच गोंधळ उडाला. हे पेपरफुटी प्रकरणं ताजं असताना आता आणखीन एक मोठी बातमी समोर आली आहे.
सोशल मीडियात आता आणखीन एक पेपर फुटल्याचं वृत्त समोर येत आहे. सध्या व्हॉट्सअॅपवर १२वीचा हिंदी विषयाची प्रश्नपत्रिका व्हायरल होत असल्याचं समोर येत आहे. हिंदी विषयाची परीक्षा २ एप्रिल रोजी होणार आहे.
या संपूर्ण विषयावर सीबीएसईने भाष्य केलं आहे. व्हॉट्सअॅपवर व्हायरल होणारा पेपर हा खोटा असल्याचं बोर्डानं म्हटलं आहे. तसेच विद्यार्थ्यांनी अशा प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवता अभ्यासाकडे लक्ष देण्याचं आवाहनही केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने केलं आहे.
सीबीएसई बोर्डाच्या १२वीचा हिंदी विषयाची परीक्षा २ एप्रिल रोजी होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच सोशल मीडियात एक प्रश्नपत्रिका व्हायरल होत आहे. ही प्रश्नपत्रिका खोटी असल्याचा दावा बोर्डाकडून करण्यात येत आहे.
सीबीएसई बोर्डाचा दहावीच्या गणित आणि बारावीच्या अर्थशास्त्र विषयाचा पेपर फुटल्याचे समोर आलं होतं. या प्रकरणी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाराजी व्यक्त केली होती. या प्रकारामुळे बोर्डाची मोठी पंचायत झाली.
पेपर फुटल्यानंतर केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) बारावीच्या अर्थशास्त्राच्या पेपरची तारीख जाहीर केली आहे. अर्थशास्त्राचा पेपर २५ एप्रिलला होणार असल्याचे सांगितले. तर, दहावीच्या पेपरफुटीप्रकरणी तपास सुरू असून १५ दिवसांत फेरपरीक्षा घ्यायची अथवा नाही याबाबत निर्णय घेतला जाईल, असे सांगत फेरपरीक्षा झाल्यास ती फक्त दिल्ली आणि हरियाणामध्येच होईल आणि ती जुलैमध्ये घेतली जाईल, असेही बोर्डाने स्पष्ट केले आहे.