दहावी, बारावी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना 'बेस्ट'ची विशेष सवलत

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा कालावधीत घर ते परीक्षा केंद्रापर्यंत सवलतीत प्रवास करता येणार आहे. 

दहावी, बारावी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना 'बेस्ट'ची विशेष सवलत
संग्रहित छाया

मुंबई :  माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालांत परीक्षार्थी अर्थात दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना बेस्ट बसेसची विशेष सवलत मिळणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा कालावधीत घर ते परीक्षा केंद्रापर्यंत मोफत प्रवास करता येणार आहे. तशी सवलत मुंबई बेस्ट प्रशासनाने दिली आहे. याबाबत बेस्टने एक प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे. विद्यार्थी परीक्षेचे हॉलतिकीट दाखवून परीक्षा केंद्रापर्यंत प्रवास करु शकतात.

 परीक्षा कालावधीमध्ये बसपासधारक विद्यार्थ्यांचे बसपास त्यांचे निवासस्थान आणि परीक्षा केंद्रादरम्यान वैध मानण्यात येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना बसचे वेगळे तिकीट घ्यावे लागणार नाही. तसेच ज्या विद्यार्थ्यांकडे पास नसेल त्यांनी परीक्षा केंद्राच्या प्रवेशपत्रावरील शाळेचा शिक्का पाहून संबंधित विद्यार्थी महापालिका शाळेचा विद्यार्थी असल्याची खात्री करुन पूर्ण प्रवास भाडे न आकरता सवलतीच्या प्रवासभाड्यात प्रवास करु शकेल. तसेच परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांना बसमध्ये पुढील प्रवेशद्वाराने गाडीत प्रवेश करण्याची  मुभाही देण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांची परीक्षा कालवधी कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी गर्दीच्या बस थांब्यावर अधिकारी, पर्यवेक्षकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना बसमध्ये चढण्यास गैरसोय होणार नाही, अशी माहिती बेस्ट प्रशासनाने दिली आहे.