पावसामुळे उशीर झालेल्या 'टीईटी'च्या परीक्षार्थींना नाकारला प्रवेश

पावसामुळे 'महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षा' अर्थात 'महा टीईटी'च्या परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर उशीरा पोहचलेल्या परीक्षार्थींना परीक्षेला मुकावं लागलंय. 

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jul 22, 2017, 04:25 PM IST
पावसामुळे उशीर झालेल्या 'टीईटी'च्या परीक्षार्थींना नाकारला प्रवेश title=

मुंबई : पावसामुळे 'महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा' अर्थात 'महा टीईटी'च्या परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर उशीरा पोहचलेल्या परीक्षार्थींना परीक्षेला मुकावं लागलंय. 

ठाण्यात पाचपाखाडी परीसरातील सरस्वती एज्युकेशन सोसासटीमध्ये हा प्रकार घडला. शनिवारी 'टीईटी' परीक्षेसाठी सकाळी १०.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत वेळ देण्यात आली होती. या परीक्षेसाठी परीक्षार्थी ठाणे, मुंबई, टीटवाळा अशा अनेक ठिकाणांहून परीक्षेच्या ठिकाणी दाखल झाले होते. परंतु, 'आपल्याला पोहचण्यास दहा मिनिटे उशीर झाला... १० वाजून १० मिनिटांनी परीक्षा केंद्रावर पोहचूनही दरवाजे उघडण्यास आणि प्रवेश देण्यास नकार देण्यात आला' अशी प्रतिक्रिया या परीक्षेला मुकलेल्या दीपक यांनी दिलीय. त्यांच्याप्रमाणेच इतर उशीर झालेल्या परीक्षार्थींनाही या परीक्षेला मुकावं लागलंय. यावर संताप व्यक्त करत, परीक्षेसाठी दिली जाणारी सेंटर्स जवळची दिली जावीत, अशी मागणी त्यांनी केलीय.  

धुळ्यात परीक्षार्थींचं आंदोलन...

दरम्यान, अशीच परिस्थिती धुळ्यामध्येही पाहायला मिळाली. टीईटी (TET) च्या परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर येण्यास उशीर झालेल्या परीक्षार्थींनाही प्रवेश नाकारला गेला. विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू न दिल्याने शहरातील चार परीक्षा केंद्राबाहेर विद्यार्थी आणि पालकांचे आंदोलन करत आपला रोष व्यक्त केला.