नैराश्याला चेहरा नसतो... आशुतोष भाकरेच्या आईची भावनिक पोस्ट

मेंदू हा सर्वात जास्तं काम करतो मग त्याची निगा पण तितकीच ठेवली पहिजे.

Updated: Aug 14, 2020, 01:58 PM IST
नैराश्याला चेहरा नसतो... आशुतोष भाकरेच्या आईची भावनिक पोस्ट

मुंबई : अभिनेत्री मयुरी देशमुखचा नवरा, अभिनेता आशुतोष भाकरेने राहत्या घरी आत्महत्या केली. या घटनेनंतर साऱ्यांनाच धक्का बसला. आशुतोषने इतक्या टोकाचा निर्णय घेतला. तो असं काही वागेल याची कुणाला कल्पना देखील नव्हती. या प्रसंगाला तोंड दिल्यानंतर आशुतोषच्या आईने आपली भावना सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली आहे. 

To spread the awareness about Mental health Please share this post with as many people as you can. Depression is real &...

Posted by Asmita Borkar on Tuesday, August 11, 2020

जास्तीतजास्त लोकांनी डिप्रेशन ह्या गंभीर आजारावर गांभीर्याने विचार करावा म्हणुन मी लिहीत आहे. आई चे दुःख तर खूप आहे पण आम्ही सर्वांनी आणि खास करून मयुरी नी केलेल्या प्रयत्नांनी आशु खुप बरा झालेला , पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आशु ला मदत करण्यासाठी इतके लोक होते त्याचे वडील स्वता अेम. अेस.डाॅक्टर , पत्नी , सासू-सासरे उच्च शिक्षित , सर्व नातेवाईक , मित्र-मैत्रिणी समंजस, सपोर्टीव पण आम्हाला न कळू देता आम्हाला सोडून गेला... अशी भावूक पोस्ट आशुतोषच्या आईने केली आहे. 

आजच्या स्पर्धेच्या युगात नैराश्यग्रस्तांची (Depression) संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तुमच्या कुटुंबात ही अशी व्यक्ती असू शकते. माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे की अशा व्यक्ती कडे दुर्लक्ष करु नका. त्याला बोलतं करा, त्याला सपोर्ट करा आणि मनोविकार तज्ञांच्या ट्रीटमेंट साठी प्रोत्साहित करा. 

मेंदू हा सर्वात जास्तं काम करतो मग त्याची निगा पण तितकीच ठेवली पहिजे. आपण कॅन्सर किंवा हृदय विकार असलेल्या व्यक्तींकडे ज्या प्रेमाने आपुलकीने हात देतो, डॉक्टर कडे नेतो तितकीच  काळजी आणि आधाराची गरज मानसिक त्रासात असणार्‍या व्यक्तीला असते. त्याला त्याच्यातून बाहेर काढणेसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा आणि समजून घ्या. 

नैराश्याला चेहरा नसतो, नाहीतर सर्वांना हसवणारा, नेहमी मदत करणारा आशु असं करूच नसता शकला. ह्या विषयावर गांभीर्याने विचार आणि चर्चा केली पाहिजे तरच आपण अशा नैराश्याच्या रुग्णांना मदत करू शकू. नैराश्य हा खराखुरा अस्सल व त्रासदायक आजार , त्याकडे दुर्लक्ष  करु नका .एकमेकांना मदत करा मानसिक आधार द्या , रुग्ण नक्कीच बरा होवू शकतो. ह्या रुग्णांकडे सकारत्मकतेने पहा हीच  एका आईची विनंती.