मिलिंद शिंदे थोडक्यात बचावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले....

आजुबाजूच्या वातावरणाचा त्यांना अंदाज नव्हता

Updated: Aug 3, 2021, 09:19 PM IST
मिलिंद शिंदे थोडक्यात बचावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले....  title=

मुंबई : कोरोनाचं संकट काही अंशी नियंत्रणात आल्याचं लक्षात येताच काही व्यवहार आणि क्षेत्रांमध्ये लागू करण्यात आलेल्या कठोर नियमांत शिथिलता आणण्यात आली. चित्रपट वर्तुळही याला अपवाद ठरलं नाही.  नियम आणि अटींचं पालन करत अनेक चित्रपट आणि मालिकांच्या चित्रीकरणास सुरुवात झाली. 
 
खलनायकी भूमिकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता मिलिंद शिंदे यांनीही त्यांच्या आगामी चित्रपटासाठी काम करण्यास सुरुवात केली. पण, त्यांच्यासोबत एक अशी घटना घडली, जी पाहता दैव बलवत्तर म्हणूनच मोठं संकट टळलं अशीच प्रतिक्रिया अनेकांनी दिली. 

बऱ्याच प्रतीक्षेनंतर चित्रपटाचे चित्रीकरण सुरु झाल्याने सर्वजण अगदी उत्साहात होते. चित्रपटाच्या गरजेनुसार मोठमोठाले लाईट्स, जिमी जीब क्रेन्स, मल्टिकॅमेरा सेटअप लावण्यात आला. रात्रीच्या वेळी  चित्रपटाच्या चित्रीकरणाचे काम सुरु होणार होते. नेहमीप्रमाणे मिलिंद शिंदे आपल्या भूमिकेसाठीच्या सरावाला लागले. आजुबाजूच्या वातावरणाचा त्यांना अंदाज नव्हता. पण, कॅमेरापासून जिमी जीब पर्यंत सारंकाही आपआपल्या जागी होतं. कॅमेरा टीमचाही मंद प्रकाशात सराव सुरु होता. 

एका दृश्यासाठी जिमी जीब क्रेनचं वेगाने खाली येणं हा चित्रीकरणाचा एक महत्वपूर्ण भाग होता आणि म्हणूनचं क्रेनच्या वेगाचे नियंत्रण हे चोख असावे यासाठी टीम काम करत होती. या आव्हानात्मक शॉटच्या सरावात टीम व्यग्र असतानाच पुढं घडलेल्या गोष्टींचा कोणालाही अंदाज नव्हता. सरावात मग्न असलेले मिलिंद शिंदे हे क्रेन ज्या दिशेने खाली येणार होती नेमके तिथेचं उभे होते हे कोणाच्याही लक्षात आलं नाही, त्याचवेळी जिमी जीब क्रेन नियंत्रित करणाऱ्या ऑपरेटरला खाली उभे असलेले मिलिंद शिंदे दिसले आणि सरावादरम्यान वेगाने खाली येणाऱ्या जिमी जीब क्रेनला त्याने अगदी चपळाईने नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत दुसऱ्या बाजूला वळवलं. नेमक्या त्याच क्षणी मिलिंद शिंदें काही  सेकंदांसाठी खाली वाकले आणि थोडक्यात बचावले. जिमी जीब ऑपरेटरने प्रसंगावधानामुळे दाखवून ती क्रेन नियंत्रित केली म्हणून होणारा मोठा अपघात टळला. 

नवऱ्याची प्रत्येक गोष्ट मला माहिती पाहिजे, पण माझी नाही; मॉडेलचं खळबळजनक वक्तव्य 

 

...तर संकटाची सावलीही आपल्यावर पडत नाही. 
आपल्यावर घोंगावलेल्या त्या संकटाबाबत सांगताना मिलिंद शिंदे म्हणतात, "एखादं चांगलं काम आपल्या हातून घडत असेल तर, संकटाची सावलीदेखील आपल्यावर पडत नाही. अगदी त्याचप्रमाणे मी जरी माझ्या भूमिकेच्या तयारीत रमून गेलो होतो, रात्रीच्या वेळी आबाजूला चालत असलेल्या गोष्टीदेखील मला त्या क्षणासाठी दिसल्या नाहीत मग ती मोठी जिमी जीब का असेना. मी त्यावेळी जर झुकलो नसतो तर त्या लोखंडी जिमी जीबच्या माराने कदाचित मला गंभीर दुखापत झाली असती, पण सेटवरच्या सकारात्मक ऊर्जेमुळे मला खरचटलंदेखील नाही. सेटवर लोकांनी वेळीचं दाखवलेल्या प्रसंगावधामुळे माझा जीव वाचला. मी जरी माझ्या कामात रमलो असलो तरी सेट वरील प्रत्येकाने मला कोणतीही इजा होणार नाही याची काळजी घेत काम केलं याचं मला कौतुक वाटतं."

शैलेश नरवाडे दिग्दर्शित ऍक्शन, ड्रामा, आणि नव्या धाटणीच्या कथानकासोबत 'जयंती' या चित्रपटातून मिलिंद शिंदे चाहत्यांच्या भेटीला येणार आहेत. प्रदर्शनाआधीच त्यांच्या या चित्रपटाची कमाल चर्चा सुरु आहे.