मुंबई : मार्च महिन्यापासून देशामध्ये करोनाने थैमान घातलंय. आतापर्यंत अनेक जणांना करोनाची लागण झाली आहे. देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ५८,१८,५७१ वर जाऊन पोहोचला आहे. त्यातच आता छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता राहुल सुधीरला करोनाची लागण झाली आहे. राहुलने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. राहुल छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता असून ‘इश्क में मरजावां २’ या मालिकेमुळे तो घराघरात पोहोचला आहे.
राहुलला कोरोना विषाणूचे सौम्य लक्षणं असल्याचं जाणवू लागल्यामुळे त्याने स्वतःला घरात क्वरंटाईन करून घेतले आहे. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. राहुलला कोरोनाची लागण झाल्याचं कळताचं संपूर्ण स्टुडिओ सॅनिटाईज करण्यात आल्याचं 'Beyond Dreams' कडून सांगण्यात आलं आहे.
गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाच्या ८६,०५२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर उपचारसुरु असलेल्या ११४१ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ५८,१८,५७१ वर जाऊन पोहोचला आहे. यापैकी ९,७०,११६ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर देशातील ४७,५६, १६५ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.
मात्र, आतापर्यंत कोरोनामुळे देशभरात ९२,२९० लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्याच्या घडीला महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेले राज्य आहे. राज्यात एकूण कोरोना संक्रमितांची संख्या १३,००,७५७ वर पोहोचली आहे.