सिंहाच्या तोंडाला केक लावलेल्या व्हिडिओवर रवीना टंडन संतप्त

प्राणी प्रेमी असलेल्या रवीनाचा राग अनावर

Updated: Jun 14, 2019, 08:34 PM IST
सिंहाच्या तोंडाला केक लावलेल्या व्हिडिओवर रवीना टंडन संतप्त  title=

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये काही लोक सिंहाच्या तोंडावर केक मारत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनचा रागाचा पारा चांगलाच चढला आहे. या व्हिडिओबाबत तिने सोशल मीडियावर राग व्यक्त केला आहे. रवीना नेहमीच जनावरांसाठी आवाज उठवत असते. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर रवीनाने ट्विट करत नाराजी व्यक्त केली आहे. 

गेल्या अनेक वर्षांपासून रवीना टंडन चित्रपटांपासून दूर आहे. परंतु तरीही ती सतत चर्चेत असते. प्रत्येक मुद्दयावर ती तिच्या प्रतिक्रिया मांडत असते. अशातच प्राणी प्रेमी असलेल्या रवीनाने हा व्हिडिओ पाहिल्यानंतर राग व्यक्त करत एक पोस्ट शेअर केली आहे. 

ट्विटरवरुन पोस्ट शेअर करत रवीनाने 'मला असं वाटतं लोकांचं कर्म आपल्या 'नागिन' चित्रपटासारखं त्यांच्यासमोर यावं.' असं म्हणत आपला राग व्यक्त केला आहे. 

हा व्हिडिओ ट्विटरवर ५ जून रोजी शेअर करण्यात आला आहे. एका यूजरने हा व्हिडिओ शेअर करत 'या व्हिडिओमध्ये असणाऱ्या प्रत्येकाने आपल्या तोंडावर केक मारण्याची गरज असल्याचं' कॅप्शन लिहिलं होतं. तेव्हापासून हा व्हिडिओ व्हायरल होण्यास सुरुवात झाली होती.