मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा जोनस आणि पती निक जोनसच्या घटस्फोटांच्या चर्चांना उधाण आलं होतं. प्रियांकाने फक्त आपल्या सोशल मीडियावरून आपलं आडनाव काढलं ज्यामुळे घटस्फोटाच्या चर्चांना सुरूवात झाली. त्यानंतर प्रियांका चोप्रा जोनस आपला नवरा निक जोनस आणि जोनस ब्रदर्स यांना सोशल मीडियावर आणि भर स्टेजवर रोस्ट करताना दिसली. यामध्ये तिने तिच्या आणि नवरा निक संबंधत अनेक गोष्टींबद्दल वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे प्रियांका-निक आणि त्यांचं नातं पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनले आहेत.
नेटफ्लिक्सवर काल रात्री रिलीज झालेल्या जोनास ब्रदर फॅमिली रोस्ट या शोमध्ये प्रियंका चोप्रा हातात माईक घेऊन आहे आणि जवळपास प्रत्येक मुद्द्यावर तिच्या पतीची ती खिल्ली उडवत आहे. कॉमेडिच्या माध्यमातून प्रियांकाने निक आणि त्याच्या कुटुंबातील बऱ्याच गोष्टींबद्दल माहिती सांगितली आहे.
जेव्हा प्रियांका चोप्रा जोनसने तिचा नवरा निक जोनसला रोस्ट करायला सुरुवात केली तेव्हा तिच्या चेहऱ्याचे हावभाव स्पष्ट सांगत होते की, हे सगळं करताना तशी ती फारशी कंफर्टेबल नाही. परंतु तरीही तिने या शोमध्ये कॉमेडी केली. ज्यामध्ये ती स्वत:ची खूपच प्रशंसा करत होती. तर नवऱ्याची इज्जत काढत होती.
प्रियांका चोप्रा जोनस आणि निक जोनस यांच्या वयातील अंतरावर नेहमीच प्रश्न उपस्थित केले जातात. या शोमध्ये अभिनेत्रीही या विषयावर मोकळेपणाने बोलली आणि तिने या एज गॅपचे फायदे तोटे देखील मजेदार पद्धतीने सांगितले.
प्रियांका चोप्रा म्हणाली की, आम्ही दोघे एकमेकांना शिकवत राहतो. ती म्हणाली, "निक आणि माझ्यामध्ये 10 वर्षांचे अंतर आहे. 90 च्या दशकातील पॉप कल्चरची बरीच सामग्री आहे जी त्याला समजत नाही आणि मला त्याला ती समजावून सांगते. तर तो मला टिक टॉक वापरायला शिकवतो. तुला समजलं ना... यशस्वी करिअर म्हणजे काय ते मी त्याला समजावून दिलं आहे."
या शोमध्ये प्रियांका चोप्राने तिच्या लोकप्रियतेची जोरदार प्रशंसा केली, या उलट तिच्या पतीला खाली पाडण्यात आणि त्याची खिल्ली उडवण्यात कोणतीही कसर सोडली नाही. अभिनेत्री म्हणाली, "जोनास बंधू ऑनलाइन किती मजकूर पोस्ट करतात हे तुमच्या लक्षात आले आहे का? ते जवळजवळ नेहमीच Instagram वर असतात... त्यांचे फोन चालत असतात. परंतु या तिघांचे फॉलोअर्स मिळूनही माझ्या एकटी इतके फॉलोअर्स नाहीत. त्यामुळे माझ्या मते, मी सर्वात लोकप्रिय जोनस आहे."
प्रियांका चोप्रा जोनासने तिच्या नावावरून पतीचे आडनाव 'जोनास' हटवल्यापासूनच ती चर्चेत आली आहे. काहींनी सांगितले की, ती लवकरच निकपासून घटस्फोट घेणार आहे, तर काहींनी तिच्या आगामी रोस्ट शोचे कारण सांगितले. प्रियांका चोप्राच्या आईनेही घटस्फोटाचे वृत्त फेटाळून लावले, मात्र अद्याप स्वतः अभिनेत्रीकडून कोणतेही वक्तव्य आलेले नाही.