Anil Kapoor Pan Masala: बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर 67 व्या वर्षीदेखील चिरतरुण दिसतो. प्रत्येकाला त्याच्या एव्हरग्रीन तारुण्याचे रहस्य जाणून घ्यायचे असते. सिनेमांमध्ये त्याने उत्तम काम करुन प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. पण खऱ्या आयुष्यातदेखील त्याने असं काही केलंय, ज्यामुळे तुम्हीदेखील त्याचे कौतुक कराल. कारण त्याने उचललेल्या एका पावलामुळे त्याची सगळेजण वाहवा करत आहेत. असं त्याने नेमके काय केलंय? जाणून घेऊया.
पान मसाल्याचे सेवन आरोग्यासाठी धोकादायक असते. यासंदर्भात त्यावर सूचना जाहीर केलेली असते. तरी तुम्ही शाहरुख खान, अक्षय कुमार आणि अजय देवगण यांना पान मसालाची जाहिरात करताना पाहिले असेल. या कारणावरुन त्यांना सर्वत्र ट्रोल केले जाते. इन्फ्लूएन्सर जर पैशांसाठी अशा जाहिराती करु लागले आणि तरुण पिढी पान मसाल्याच्या आहारी गेली तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न त्यांना नेहमी विचारला जातो. हीच चूक अनिल कपूरने करणे टाळले.
अनिल कपूरला देखील पान मसालाच्या जाहिरातीची तगडी ऑफर आली होती. पण अनिल कपूरने पान मसाल्याची जाहिरात करण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. या जाहिरातीसाठी त्याला तब्बल 10 कोटी रुपये मिळू शकले असते. पण त्याने सत्सत विवेक बुद्धीने ही जाहिरात नाकारली. यामुळे अनिल कपूर सध्याचा कौतुकाचा मानकरी ठरलाय.
'फायटर' अभिनेता अनिल कपूर निरोगी आणि तंदुरुस्त आरोग्य जगण्यावर भर देतो. वयाच्या 67 व्या वर्षीही तो कार्डिओ करतो. घरच्या व्यायामशाळेत घाम गाळतो. समुद्रकिनार्यावर चालायला जातो. तीन मुलांचा बाप आणि एकाचा आजोबा बनलेल्या अनिलने चाहत्यांमध्ये चुकीचा संदेश जाऊ नये यासाठी पान मसाल्याची ऑफर नाकारली असावी, असे म्हटले जाते.
अनिल कपूरने ही जाहिरात स्वीकारली असतील तर त्याला चांगले पैसेही मिळाले असते. माझ्या चाहत्यांसाठी आणि दर्शकांप्रती आपली जबाबदारी आहे. कितीही मोबदला मिळाला तरी आरोग्यास हानी पोहोचेल अशा उत्पादनाचे समर्थन करू इच्छित नाही, असे अनिल कपूरने म्हटले आहे. पिंकविलाने यासंदर्भात वृत्त दिले आहे.