अशोक मामा टीव्ही सीरियलमध्ये दिसणार, दोन दशकांनंतर कमबॅक!

Ashok Saraf Comeback on Tv Serial : अशोक सराफ लवकरच या मालिकेतून पुन्हा एकदा येणार प्रेक्षकांच्या भेटीला...

दिक्षा पाटील | Updated: Sep 23, 2024, 11:49 AM IST
अशोक मामा टीव्ही सीरियलमध्ये दिसणार, दोन दशकांनंतर कमबॅक! title=
(Photo Credit : Social Media)

Ashok Saraf Comeback on Tv Serial : महाराष्ट्र भूषण अशोक सराफ हे हिंदी-मराठी कलाविश्वातील हरहुन्नरी अभिनेते म्हणून ओळखले जातात. अशोक मामांनी आजवर अनेक सुपरहिट चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये काम केलंय. मध्यंतरी काही दिवस ते छोट्या पडद्यापासून दूर होते. पण आता पुन्हा एकदा छोटा पडदा गाजवायला ते सज्ज आहेत. झी टिव्हीवरील 'हम पांच' या मालिकेतून अशोक सराफ यांनी सगळ्या प्रेक्षकांची मने जिंकली. 

टेलिव्हिजनचा पडदा व्यापून टाकायला महाराष्ट्राचा महानायक परत येतोय. त्यांच्या या नव्या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. या प्रोमोला पाहता प्रेक्षकांना काही तरी गूढ आणि थरारक पाहायला मिळणार याची उत्सुकता लागली आहे. प्रत्येक गोष्टीची खबरदारी घेणारे, अत्यंत शिस्तप्रिय, काटेकोरपणे वागणारे अशोक मामा दिसत आहेत. तसेच 'शिस्त म्हणजे शिस्त' हा त्यांच्या आयुष्याचा फंडा असल्याचं प्रोमोमध्ये स्पष्ट होत आहे. पण त्यांच्या मिश्कील अंदाजाने सर्वांच्या चेहऱ्यावर ते हसू आणणार आहेत. एकंदरीतच अशोक मामा आणि या त्यांच्या नव्या मालिकेच्या पात्राचं नाव देखील सारखंच आहे. 

त्यांच्या या आगामी मालिकेविषयी बोलताना अशोक मामा म्हणाले, 'मालिका खूपच मनोरंजक आहे. चिन्मय मांडलेकरनं या मालिकेची कथा खूप चांगल्या पद्धतीने लिहिली आहे. 'टन टना टन' या मालिकेनंतर अनेक वर्षांनी पुन्हा छोट्या पडद्यावर कमबॅक करतोय. शूटिंग करताना खूप मजा येतेय. प्रेक्षकांनाही ही मालिका नक्कीच आवडेल.'

हेही वाचा : ‘नवरा माझा नवसाचा 2’ ची थेट 'स्री-2'ला टक्कर! विकेण्डला केली 'इतक्या' कोटींची कमाई

मालिकेचा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर कमेंट करत त्यांची उस्तुकता दाखवली आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, 'अशोक मामांना अशा वेगळ्या भूमिकेत बघण्याची पर्वणी मिळणार.. या वयातही हा उत्साह उल्लेखनीय आहे.. खूप काही शिकण्यासारखं आहे मामांकडून' अशाच अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी मालिका पाहण्यासाठी उत्सुक असल्याचं दाखवलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

'अशोक मा.मा.' असं या मालिकेच नाव आहे. या मालिकेचा पहिला प्रोमो समोर आल्याने प्रेक्षकांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. मालिकेत नक्की काय पाहायला मिळणार याबाबतची प्रेक्षकांची उत्कंठा आता वाढली आहे. तसेच अशोक मामांसह आणखी कोणते कलाकार या मालिकेत झळकणार? मालिका कधीपासून सुरू होणार या सर्व प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना लवकरच मिळणार आहेत.