Amitabh Bachchan यांच्या वाढदिवसाला अभिषेकनं रडवलं; Video पाहून तुम्हीही वडिलांना घट्ट मिठी माराल

Amitabh Bachchan Birthday :वडील- मुलाचं हे सुरेख नातं डोळ्यात पाणी आणतंय... अभिषेकनं काय केलंय पाहाच

Updated: Oct 11, 2022, 11:51 AM IST
Amitabh Bachchan यांच्या वाढदिवसाला अभिषेकनं रडवलं; Video पाहून तुम्हीही वडिलांना घट्ट मिठी माराल
Bollywood Actor Abhishek bachchan shares emotional video on father amitabh bachchan 80 th birthday

Amitabh Bachchan Birthday : 'नमश्कार देवियों और सज्जनो... मै अमिताभ बच्चन आप सभी का स्वागत करता हूँ'....हा आवाज कानांवर पडल्यानंतर नजर आपोआप एका चेहऱ्यावर खिळते. महानायक, शहनशाह, मुकद्दर का सिकंदर अशी ओळख असणारा हा चेहरा म्हणजे बिग बींचा. अमिताभ हरिवंशराय बच्चन असं नाव असणाऱ्या अमिताभ यांनी गेल्या अनेक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. हा अभिनेता अनेकांसाठी आदर्श, कोणासाठी आधार, तर कोणासाठी प्रेरणास्त्रोत. कुटुंबीयांसाठी बिग बी म्हणजे हक्काचे, जिवाभावाचे 'पा'. 80 वा वाढदिवस साजरा करणाऱ्या याच अमिताभ यांच्यासाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव सुरु असतानाच त्यांच्या लेकानं म्हणजेच अभिनेता (Abhishek Bachchan) अभिषेक बच्चन यानंही सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. (Bollywood Actor Abhishek bachchan shares emotional video on father amitabh bachchan 80 th birthday)

बिग बींच्या वाढदिवसाच्या दिवशी अभिषेकनं शेअर केलेला हा व्हिडीओ पाहताना नकळतच डोळ्यात पाणी येत आहे. वडील मुलाचं नि:स्वार्थ नातं या अवघ्या काही सेकंदांच्या व्हिडीओमधून पाहताना तुम्हालाही तुमचे वडील आठवतील. इतकंच नव्हे तर तडक जाऊन तुम्हीही त्यांना घट्ट मिठी माराल. 

अभिषेकनं नुकतंच KBC अर्थात 'कौन बनेगा करोडपती' (Kaun Banega Crorepati) या कार्यक्रमाच्या सेटवर जाऊन अमिताभ यांना सरप्राईज दिलं. त्यासाठी त्यांना कशाचीही भनक लागू न देता तालमीला जाणं, सर्व व्यवस्था पाहणं या साऱ्याची पडद्यामागची गोष्ट अभिषेकनं नेटकऱ्यांशी आणि चाहत्यांशी शेअर केली. 

अधिक वाचा : Amitabh Bachchan Fitness : वयाच्या 80 व्या वर्षीही बिग बींचा फिटनेस पंचविशीतल्यांना लाजवणारा 

 

'बाबांना त्यांच्या सर्वात आवडत्या ठिकाणी, अर्थात त्यांच्या कामाच्या ठिकाणी जाऊन 80 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देणं हा अतिशय भावनिक क्षण होता', असं म्हणत अभिषेकनं कॅप्शनच्या माध्यमातून चाहत्यांनाही हे क्षण पाहण्याची विनंती केली. यावेळी काही कुतूहलाचे क्षण सर्वांनाच दाखवण्यासाठी एखादं लहान मूल जसं उत्सुक असतं अगदी तशीच उत्सुकता त्याच्या या शब्दांत पाहायला मिळाली. 

सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओला क्षणातच असंख्य लाईक्स मिळाले. अनेकांनी त्याच्याच खाली कमेंट्स करत लाडक्या अभिनेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या निरोगी आयुष्यासाठी सदिच्छाही व्यक्त केल्या. कोणाही व्यक्तीसाठी त्याच्या हितचिंतकांचं आणि कुटुंबीयांचं प्रेम हीच त्याची खरी श्रीमंती आणि या बाबतीत बिग बी नक्कीच भल्याभल्यांना मागे टाकतात. नाही का?