Akshay Kumar on Narendra Modi: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) 'पठाण' (Pathaan) चित्रपटाला होणाऱ्या राजकीय विरोधामुळे पुन्हा एकदा बॉलिवूड विरुद्ध राजकारण असं चित्र गेल्या काही दिवसात निर्माण झालं होतं. 'बेशरम' गाण्यात दिपिकाने (Deepika Padukone) भगवी बिकिनी घातल्याने हिंदुत्ववादी संघटनांसह भाजपा नेत्यांनीही जोरदार विरोध केला होता. मात्र आता स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी चित्रपटांवर भाष्य करणाऱ्या भाजपा नेत्यांवर फटकारलं आहे. नरेंद्र मोदी यांनी भाजपा नेत्यांना विनाकारण चित्रपटांवर टीका करु नका असा सल्ला दिला आहे. त्यानंतर आता बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने (Akshay Kumar) नरेंद्र मोदींचं कौतुक केलं असून ते भारतातील सर्वात मोठे प्रभावशाली व्यक्ती असल्याचं म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवी दिल्लीत पार पडलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांना सांगितलं की "एखाद्याची मेहनत वाया जाईल अशाप्रकारचं कोणतंही विधान करणं टाळलं पाहिजे". अक्षय कुमार आपला आगामी चित्रपट 'सेल्फी'च्या ट्रेलर लाँचसाठी पोहोचला असता त्याला मोदींच्या या विधानाबद्दल विचारण्यात आलं. त्यावर त्याने सकारात्मकतेचं नेहमी स्वागत केलं पाहिजे असं म्हटलं.
"सकारात्मकतेचं नेहमीच स्वागत आहे. जर आपल्या पंतप्रधानांनी असं काही विधान केलं असेल तर ते उत्तमच आहे. ते भारतातील सर्वात मोठे प्रभावशाली व्यक्ती आहेत. जर ते असं काही म्हणत असतील तर यामुळे जर गोष्टी बदलत असतील तर चित्रपटसृष्टीसाठी ही सर्वोत्तम बाब आहे," असं अक्षय कुमारने म्हटलं आहे.
पुढे त्याने सांगितलं की "आम्ही फार कष्ट घेत असल्याने गोष्टी बदलल्याच पाहिजेत. आम्ही चित्रपट तयार करतो, सेन्सॉर बोर्डाकडे जातो, ती संमत करुन घेतो आणि त्यानंतर कोणीतरी काही बोलतं आणि वाद निर्माण होतो". पण आता पंतप्रधान स्वत: बोललेत त्यामुळे हे आमच्यासाठी चांगलं आहे अशी भावना अक्षयने व्यक्त केली आहे.
दरम्यान अक्षय सध्या आपला आगामी चित्रपट 'सेल्फी'साठी तयारी करत आहे. राज मेहता यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात अक्षयसह इमरान हाश्मी, नुशरत भरुचा मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट 24 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.
याशिवाय अक्षय कॅप्सूल गिल, बडे मियाँ छोटे मियाँ, ओ माय गॉड २ चित्रपटांसाठी शुटिंग करत आहे. तसंच 'वेडात मराठे वीर दौडले सात' चित्रपटाच्या निमित्ताने अक्षय मराठी चित्रपसृष्टीत पदार्पण करत आहे.