मुंबई : सोशल मीडियाच्या माध्यमातून सेलिब्रिटी आणि चाहत्यांमध्ये असणारी दरी कमी होते ही बाब अनेकांना पटते. पण, मुळात ही दरी कमी होण्यासोबतच आणखी एक मुद्दाही डोकं वर काढतो. तो म्हणजे एखाद्याच्या खासगी आयुष्याविषयीचा. अनेकदा सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्यात प्रमाणाहून जास्त डोकावर चाहते, किंवा इतर नेटकरी त्यांच्यासाठी अडचणी उभ्या करतात. सध्या अशाच अडचणींचा सामना करत आहे अभिनेता अली फजल. सोशल मीडिया ट्रोलिंग, सायबर क्राईम याचा फटका अलीला बसला आहे.
अलीचे काही न्यूड फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, त्याने या वृत्ताला दुजोरा दिल्याचं वृत्त झी न्यूजने प्रसिद्ध केलं आहे. हे सारंकाही अतिशय त्रासदायक, हीन आणि अवहेलनापूर्ण असल्याची प्रतिक्रिया त्याने दिली.
'होय.... तो मीच आहे. मीच आहे तो आता मी काय बोलू? मुळात हे सारंकाही अतिशय खासगी आहे त्यामुळे याविषयी मी काय म्हणू. मला त्याविषयी कोणालाही कोणतंच स्पष्टीकरण द्यायचं नाही. हे सर्वकाही अतिशय हीन दर्जाचं आहे सध्या माझ्या खासगी आयुष्याचा आदर केला जावा असंच मला वाटतं. माध्यमांनाही मी कोणत्याच प्रकारचं स्पष्टीकरण करु इच्छित नाही', असं म्हणत त्याने एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. आपल्या खासगी आयुष्यात डोकावत अशा प्रकारे कोणी त्याचा चुकीच्या पद्धतीने वापर करणं हे त्रासदायक असल्याचं तो म्हणाला.
सोशल मीडियावर सध्या त्याचे फोटो उपलब्ध नसले तरीही झालेली चर्चा पाहता आपण या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करणार असल्याचं त्याने स्पष्ट केलं. सोबतच योग्य वेळ येईल तेव्हा या साऱ्याविषयी स्पष्टीकरणही देणार असल्याचं त्याने सांगितलं. तूर्तास या कठीण प्रसंगात नातेवाईक, मित्रपरिवार आणि चाहत्यांक़डून आपल्या खासही आयुष्याचा आदर करण्यात यावी याविषयीची आशा त्याने व्यक्त केली.