अर्जुन कपूरला कोरोनाची लागण; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत सुरु होतं चित्रीकरण

कोणतीही लक्षण आढळून आली नव्हती, पण....

Updated: Sep 6, 2020, 03:54 PM IST
अर्जुन कपूरला कोरोनाची लागण; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत सुरु होतं चित्रीकरण title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : कोरोना व्हायरसचा coronavirus वाढता विळखा सध्या अत्यंत अडचणीचा विषय ठरत आहे. मार्च महिन्यापासून अतिशय वेगानं फैलावणाऱ्या या विषाणूच्या संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न सुरु आहेत. पण, तरीही विविध स्तरांवर त्याचा फैलाव रोखण्यात येणाऱी आव्हानं कमी होण्याचं नाव घेत नाही आहे. कला क्षेत्रातही या व्हायरसची दहशत आहे. काही सेलिब्रिटींना याची लागणही झाली आहे. त्यातच आता अभिनेता अर्जुन कपूर याचंही नाव जोडलं गेलं आहे. 

अर्जुननं सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पोस्ट लिहित याबाबतची माहिती दिली. त्याला कोरोनाची कोणतीही लक्षण आढळून आली नव्हती. पण, त्याच्या कोरोना चाचणीचा अहवाल मात्र पॉझिटीव्ह आला. त्यामुळं सध्याच्या घडीला सावधगिरी म्हणून तो घरीच विलगीकरणात राहिला असून, त्याच्यावर उपचारही सुरु आहेत. 

सूत्रांच्या माहितीनुसार अर्जुन त्याच्या आगामी चित्रपटाचं चित्रीकरण करत होता. यावेळी अभिनेत्री नीना गुप्ता आणि रकुल प्रीत सिंग यांच्यासोबत तो चित्रीकरण करत होता असं म्हटलं जात आहे. अर्जुनला कोरोनाची लागण झाल्याचं कळताच चित्रपटाचं चित्रीकरण थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. 

 
 
 
 

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor) on

 

इन्स्टाग्राम पोस्टमध्ये अर्जुन लिहितो... 

'मी कोरोना पॉझिटीव्ह आढळलो आहे, हे तुम्हा सर्वांना सांगणं ही माझी जबाबदारी आहे. मी अगदी ठीक आहे, माझ्यात कोरोनाची कोणतीही लक्षणं आढळलेली नाहीत. मी प्रशासन आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानं स्वत:ला घरीच विलगीकरणात ठेवलं आहे. मी पुढचे काही दिवस होम क्वारंटाईन असेन. या प्रेमासाठी मी तुम्हाला आधीच धन्यवाद म्हणत आहे.  येत्या दिवसांमध्ये मी तब्येतीविषयीची माहिती देतच राहीन'. माणुसकीचं बळच या व्हायरसमधून सावरण्याचं बळ देईल, असं म्हणत आपण लवकर बरे होऊ असा विश्वास अर्जुननं व्यक्त केला.