पाहा, निधनानंतर इरफान खान शांततेत विसावतोय

जाण्याच्या पश्चातही जणू तो आपल्यातच आहे

Updated: Sep 22, 2020, 09:26 AM IST
पाहा, निधनानंतर इरफान खान शांततेत विसावतोय
संग्रहित छायाचित्र

मुंबई : कोरोना काळात अनेक लोकप्रिय सेलिब्रिटी, कलाकार मंडळींनी जगाचा निरोप घेतला. यातीलच एक नाव म्हणजे अभिनेता इरफान खान. अभिनयाच्या बळावर आपलं वेगळं असं साम्राज्य निर्माण करणारा अभिनेता प्रदीर्घ आजाराशी झुंज दिल्यानंतर अखेर या जगातून काढता पाय घेऊन निघून गेला. इरफानच्या निधनाला जवळपास सहा महिने उलटले. त्याच्या जाण्याच्या पश्चातही जणू तो आपल्यातच आहे, अशीच समजूत अनेक चाहत्यांनी आणि इरफानच्या कुटुंबासह त्याच्या मित्रपरिवारानंही घातली. 

कोणी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या आठवणींना उजाळा दिला, तर कोणी या अभिनेत्यानं दिलेल्या मार्गदर्शनाच्या बळावर आपली वाटचाल सुरु ठेवली. 'डी डे' आणि 'जज्बा' या चित्रपटांतून इरफानसह स्क्रीन शेअर करणाऱ्या चंदन रॉय सन्याल यानं नुकतंच या अभिनेत्याच्या आठवणीत त्याचा देह ज्या ठिकाणी विसावला आहे त्या ठिकाणाला अर्थाल इरफानच्या कबरीला भेट दिली. ज्यानंतर भावनांना वाट मोकळी करुन देत त्यानं सोशल मीडियावर काही फोटोही पोस्ट केले. सोबतच एक हृदयस्पर्शी संदेशही लिहिला. 

'कालपासूनच इरफानची आठवण येत होती. गेल्या चार महिन्यांपासून मी त्याच्या कबरीपाशी गेलो नव्हतो. पण, आज मी गेलो. तिथं तो एकटाच विसावला होता. त्याच्या आजुबाजुला काही झुडुपं वगळली तर इतर काहीही नव्हतं. अगदी शांततेत तो विसावला आहे. मी त्याच्यासाठी रजनीगंधा नेली आणि परतताना त्याच्याच आशीर्वादाच्या रुपानं त्याचाच काही भाग परत आणला.....', असं चंदननं या ट्विटमध्ये लिहिलं. त्यानं पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये इरफानची कबर दिसत असून, त्याभोवती लहान झुडुपांनी वेढा घातल्याचं पाहायला मिळत आहे. खरंच, चंदन म्हणाला त्याप्रमाणं इरफान याच झुडुपांच्या साथीनं अगदी शांततेत विसावला आहे. 

 

२९ एप्रिल, २०२०ला न्यूरोएंडोक्राइन ट्युमर या दुर्धर आजाराशी झुंज देताना इरफाननं अखेरचा श्वास घेतला होता. वयाच्या ५४ व्या वर्षी या अभिनेत्यानं सर्वांना कायमचं अलविदा केलं आणि सारं कलाविश्व आणि चाहत्यांचं वर्तुळही हळहळलं.